दिवा/ स्नेहा जाधव,काकडे: दिवा शहरातील पाणीटंचाईच्या समस्येविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आंदोलन केले. गेल्या 12 वर्षांपासून बंद असलेल्या दोन जलकुंभांचे श्राद्ध घालून शिवसेनेच्या महिला आघाडी व शिवसैनिकांनी दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध केला आणि पाणी समस्येकडे लक्ष वेधले. लवकरात लवकर पाणी प्रश्न न सुटल्यास शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
दिवा शहरातील बेतवडे येथे 12 वर्षांपूर्वी बांधलेले दोन जलकुंभ आजतागायत बंद आहेत. यामुळे शहरातील अनेक भागांत असमान पाणी वितरण होते शिवाय अनेक भागात पाणीटंचाई भेडसावत असते. याच विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
महिला पदाधिकाऱ्यांपुढाकार घेत जलकुंभाचे ‘श्राद्ध’ घातले तर , कार्यकर्त्यांनी मुंडन करून आणि ‘अंतिम संस्कार’ करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. यावेळी ज्योती पाटील यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. “जर या जलकुंभातून पाणीपुरवठा करायचाच नव्हता, तर ते कशाला बांधले? आणि त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च कोणाकडून वसूल करणार?” असे सवाल त्यांनी केले.
हे आंदोलन शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, सुभाष भोईर साहेब आणि जिल्हा संघटक तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. महिला जिल्हा संपर्कप्रमुख मृणाल यज्ञेश्वरी आणि महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर-राणे यांच्या सूचनेनुसार या आंदोलनाची योजना आखण्यात आली.
या आंदोलनात दिवा शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिषेक ठाकूर (युवासेना), तेजस पोरजी (उपशहर प्रमुख), मारुती पडळकर (उपशहर प्रमुख), प्रियंका सावंत (समन्वयक), स्मिता जाधव (उपशहर संघटिका), उज्वला पाटील (उपशहर संघटिका), आणि शनिदास पाटील (शहर संघटक) यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, विभाग प्रमुख, महिला विभाग संघटिका, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख आदी महिला-पुरुष पदाधिकारी यांनी या आंदोलनात मोलाचे योगदान दिले.