
सावंतवाडीत ‘सेवा संकल्प अभियान’ला सुरुवात; आरोग्य तपासणीसह नागरिकांसाठी विविध उपक्रम
Sindhudurg News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात या अभियानांतर्गत आरोग्य, महिला व बालविकास तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित उपक्रम राबवले जात आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील चराठे ग्रामपंचायतीत या अभियानाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव, पंचायत समिती सदस्या उत्कर्षा गावकर, सरपंच प्रचिती कुबल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आणि आजाराचा धोका असलेल्या व्यक्तींची लवकर ओळख करण्यावर भर देण्यात येणार आहे.
महिला आणि किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती, समुपदेशन आणि आवश्यक पाठपुरावा केला जाणार आहे. यासोबतच नागरिकांना निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
अभियानाच्या उद्घाटनानिमित्त आयुष्मान आरोग्य मंदिर, चराठे येथे हिमोग्लोबिन तपासणी शिबिर घेण्यात आलं. तसेच असंसर्गजन्य आजारांचा धोका असलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या विविध आरोग्य उपक्रमांचा 73 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
अभियानाच्या कालावधीत रक्तदान शिबिरे, योग, ध्यान, शारीरिक सक्रियता आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे.
दरम्यान, 1 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या ‘तिशीचा पल्ला—तपासणी अन् सल्ला’ या मोहिमेबाबतही जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यात येत आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ‘आरोग्याचा श्रीगणेशा’ या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी आरोग्य, ICDS आणि ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असं आवाहन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आलं आहे.