मुंबई : महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांना प्रदान करण्यात आला. आशा भोसले यांना हा पुरस्कार देण्यात आल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी महाराष्ट्र भूषण म्हणजे भारतरत्न आहे, असे म्हटले आहे.
‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आदींच्या हस्ते प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आशा भोसले यांनी सांगितले की, ‘माझ्यासाठी महाराष्ट्र भूषण म्हणजे भारतरत्न आहे. कारण हा माझ्या माणसांकडून मिळालेला पुरस्कार आहे. मी भारत देशाची कन्या आहे’.
तसेच त्या पुढे म्हणाल्या, ‘मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यासारखे वाटत आहे. महाराष्ट्रात आल्यावर वेगळीच भावना असते. दहा वर्षांची असताना माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. मी यापुढेही गात राहणार आहे. मला असे वाटते की, महाराष्ट्र भूषण मिळाला तो मला भारतरत्नासारखा आहे. माझ्या घरातून मिळालेला पुरस्कार आहे. मी 90 वर्षांपर्यत थांबले’.
आशाताईंना पुरस्कार देताना आनंद होतो : उपमुख्यमंत्री
‘महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आशाताईंना देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आपण अनेकवेळा व्हर्सेटाईल शब्द वापरतो. त्या शब्दाची व्याख्या म्हणजे आशाताई आहेत. त्यांनी गायलेली गाणी खूप अवीट आहे’, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.