मुंबई – मुलुंडमध्ये मराठी माणसाला एका गुजराती सोसायटीत कार्यालय भाड्याने देण्यास नकार दिल्यानंतर भाषिक वाद व प्रांत वाद होण्याची शक्यता आहे. मुलुंड परिसरात मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिल्यानंतर या प्रकरणात जाब विचारल्यावर मारहाण केल्याचाही आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे. तसेच यावरुन आता वातावरण तापले असताना, यावर विविध प्रतिक्रिया येत असताना, आता आपणाला देखील मुंबईत फक्त मराठी आहे म्हणून घर नाकारल्याचं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धक्कादायक अनुभव व्हीडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे.
केवळ मराठी म्हणून …
दरम्यान, सध्या मुलुंडमधील संतापजनक प्रकारवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मंत्री व भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी देखील आपणालाही असाच अनुभव आल्याचं सांगितलं आहे. जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी माणसांना घर देत नाहीत. मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद याच्यावर टिप्पणी केली नाही. पण एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की, इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस येथे अलाउड नाही हे म्हणत, असताना तिच्यावर प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे, असं व्हीडिओमध्ये पंकजांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मुलुंड पश्चिम परिसरातल्या शिवसदन इमारतीमध्ये आपण भाड्यानं कार्यालयासाठी जागा पाहण्यास गेलेली असताना मालकानं आम्ही महाराष्ट्रीयन माणसाला कार्यालय देणार नाही असं सांगून धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी केला आहे. तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच विविध राजकीय पक्षातून संताप व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. यानंतर आज यावरुन राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.
हा एवढा माज कोठून आला – संजय राऊत
दरम्यान, या प्रकारानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे. “हा एवढा माज कोठून आला? मुलुंड मध्ये मराठी जागा नाकारण्या पुरता हा विषय नाही.आणखी बरेच काही आहे.हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मींधे महा मंडळाने द्यायला हवे.भाजपने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी.मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डावउधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले.तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र!” असं ट्विटमध्ये राऊतांनी म्हटलं आहे.