Social activist Ganesh Pawar's ablution protest in the bogus voting case
कराड/प्रतिनिधी : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले आहे. विरोधी नेत्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप केला आहे. याबाबत महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान, याचे पडसाद कराडमध्ये देखील उमटले आहेत. कापिल गावातील बोगस मतदान प्रकरणी कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी सुरु केलेल्या आंदोलनाने आज नवा टप्पा गाठला. नरक चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी थेट प्रशासकीय इमारतीसमोर अभ्यंगस्नान करून प्रशासनाचा अनोखा निषेध नोंदवला.
मागील बारा दिवसांपासून पवार यांनी निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचे हे आंदोलन महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कापिल गावात रहिवासी नसलेल्या लोकांनी बनावट आधारकार्डच्या आधारे मतदान केले असून, हे लोकशाहीला काळिमा फासणारे कृत्य आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच आदेश नसतानाही निवडणूक शाखेत काम करणाऱ्या अव्वल कारकूनावर निलंबनाची कारवाई करून, खातेनिहाय चौकशी करावी, अन्यथा बेमुदत उपोषणास प्रारंभ करण्यात येईल, इशाराही पवार यांनी दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच आंदोलनाच्या पुढील टप्प्यातही पवार यांनी दिवाळी सणाशी निगडित उपक्रम आखले आहेत. यामध्ये मंगळवार दि. २१ रोजी उपोषणस्थळी ‘फराळ आंदोलन’ करून त्यासाठी नागरिक, पत्रकार आणि समर्थकांना निमंत्रण देण्यात आले आहे. तर बुधवार दि. २२ रोजी ‘प्रार्थना आंदोलन’ करून अधिकाऱ्यांना सद्बुद्धी यावी, म्हणून मारुती मंदिरासमोर दिवे प्रज्वलन करण्यात येणार आहे. तर गुरुवार दि. २३ रोजी ‘भाऊबीज ओवाळणी आंदोलन’ असून बहिणींना आंदोलनस्थळी बोलावून लोकशाही रक्षणाचा संदेश देण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पवार यांच्या या हटके आंदोलनाची चर्चा सध्या कराड शहरासह तालुक्यात सर्वत्र रंगली आहे.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत काही नागरिकांनीही बोगस मतदान व मतदार याद्यांतील दुबार नावे यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. एकंदरीत, दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही लोकशाही रक्षणासाठी केलेल्या पवार यांच्या या प्रतीकात्मक आंदोलनाने चर्चेचा विषय निर्माण केला आहे. दिवाळीचा सण घरी नाही, तर न्यायाच्या लढ्यात साजरा करतोय, असं म्हणत त्यांनी प्रशासनास लक्ष केले.