सुधाकर घारे यांचे सोशल इंजिनिअरिंग (फोटो सौजन्य-X)
कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात सर्व समाजघटकांशी संपर्क वाढवला असून सोशल इंजिनिअरिंगवर भर दिला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून देखील घारे यांना ताकद दिली जात असून कर्जत खालापूरमध्ये घारे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत पुन्हा नवचैतन्य आल्याचे चित्र आहे.
सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्याने विधानसभा निवडणुक अपक्ष लढविली. मात्र, निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाल्यानंतर घारे यांनी पुन्हा नव्या दमाने मतदारसंघात कामाला सुरुवात केली. दरम्यान पक्षाने घारे यांच्यासह कर्जत खालापूरातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ना मंजूर करत घारे यांना पुन्हा पक्ष कार्याशी वाहून घेण्यास सांगितले.
घारे यांनी मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग घारे यांनी राबविण्यास सुरुवात केली. मुस्लिम, आदिवासी, मागासवर्गीय, वंचित अशा सर्वच समाज घटकांना एकत्र आणून पुन्हा मोट बांधण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घारे यांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे मतदारसंघात राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे.
मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी घारे यांनी सुरु केलेल्या दर शुक्रवारी जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून रस्ते, पाणी, वीज असे प्रश्न तडीस लावण्याचा धडाका देखील घारे यांनी लावला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून घारे यांनी दुर्गम आदिवासी भागात मोफत पाणी टँकर सुरु केले आहेत. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे देखील त्यांच्या माध्यमातून सुरु आहेत. सर्व समाज घटकांशी संवाद, सामाजिक उपक्रम, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनता दरबारच्या माध्यमातून लोकांना मदत, विविध समाज घटकातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश अशा पद्धतीने घारे यांचे मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंग सुरु आहे.
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता. यावेळी घारे यांना आगामी काळात मोठी संधी मिळणार असल्याचे देखील सुतोवाच केले होते. त्यामुळे आगामी काळात घारे यांना राष्ट्रवादीकडून चांगली संधी देखील मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कर्जतमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना सुधाकर घारे हे एकमेव आव्हान देणारे नेते आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये घारे विरुद्ध थोरवे असे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारसंघात दिसण्याची चिन्हे आहेत.