सौजन्य फोटो - AI Gemini
संतोष बिराजदार (रा. सनथ नगर, सोलापूर) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपींपैकी एका मुलाचे बिराजदार यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे घरातील काही बाबींची त्याला माहिती होती. घराची चावी पायपुसणीखाली ठेवली जात असल्याचेही त्याला माहीत होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून त्याने चावी घेत घर उघडले. त्यानंतर कपाटातील लॉकर तोडून नेकलेस, अंगठी, कर्णफुले असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरला. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर त्याने घराला पुन्हा कुलूप लावले आणि चावी नेहमीप्रमाणे पायपुसणीखाली ठेवून दिली.
घरातील सोने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर बिराजदार यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील माहिती घेत तपास सुरू केला. त्यावेळी घरातील आजोबांनी शेजारचा एक मुलगा घरी आला असल्याचे पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीच्या चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मोबाईल खरेदी करण्यासाठी ही चोरी केल्याचेही त्याने मान्य केल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मोबाईल घेण्याच्या इच्छेतून दहावीतील विद्यार्थ्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले असून, त्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, दोन्ही अल्पवयीन मुलांकडून चोरीबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.






