

निवडणुकीचे राजकारण संपले; आता बँकेच्या प्रगतीचे लक्ष्य
दुसऱ्यांची गंमत करणाऱ्यांचीच गंमत झाली!
मोहिते-पाटील पॅनलला मदत कोणी केली, हे लवकरच कळेल!
Solapur District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या दणदणीत यशानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना सूचक इशारा देतानाच बँकेच्या कारभाराबाबत आक्रमक भूमिका स्पष्ट केली. ‘बँकेला पुन्हा सोनेरी दिवस आणणार असून, बँकेचे थकीत पैसे एक-एक रुपया वसूल करणार,’ असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी ‘मोका सभी को मिलता है,’ असे म्हणत राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा इशाराही दिला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला साथ देणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानताना गोरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढविण्याची परवानगी देऊन भक्कम पाठबळ दिले. जिल्ह्यातील जनतेचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे या निकालातून पुन्हा सिद्ध झाले आहे. सलग पाच निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे त्याचेच प्रतीक आहे.
जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीत आणण्यासाठी नेमके कोण जबाबदार होते, असा सवाल उपस्थित करत जयकुमार गोरे यांनी बँकेतील गैरव्यवहारांच्या चौकशीचे संकेत दिले. कलम ८८ अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती घेतली असून, दोषींवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बँकेचे पैसे थकविणाऱ्यांकडून कोणताही मुलाहिजा न ठेवता वसुली केली जाईल. कर्ज घेऊन परतफेड न करणाऱ्यांबाबत प्रेम किंवा राजकीय लोभ आड येऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी बजावले.
निवडणुकीतील राजकारण आता संपले असून, बँकेला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही बँक शेतकऱ्यांची असून, तिच्या कारभारात शिस्त आणणे आणि चुकीच्या गोष्टी दुरुस्त करणे आवश्यक आहे. नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ युवा नेतृत्वाचे आहे. प्रशांत परिचारक यांचा अनुभव वगळता बहुतांश संचालकांची ही पहिलीच टर्म आहे. त्यामुळे अनुभवी मार्गदर्शन आणि युवा नेतृत्वाच्या माध्यमातून बँकेचा कारभार सक्षम केला जाईल, असे गोरे यांनी सांगितले.
या निवडणुकीत काहींनी क्रॉस व्होटिंग होईल, अशी स्वप्ने पाहिली होती, तर काहींना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीप्रमाणे निकाल लागेल, असे वाटत होते. मात्र, अखेर विजय आमचाच झाला. काही लोक दुसऱ्यांची गंमत करत होते; पण शेवटी त्यांचीच गंमत झाल्याचे चित्र दिसले, असा टोला गोरे यांनी विरोधकांना लगावला.
मनीष देशमुख यांच्या निवडणुकीचा संदर्भ देताना त्यांनी ही लढत अटीतटीची होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. या निवडणुकीतून अनेक राजकीय अनुभव मिळाले. कोणाला कोणती जबाबदारी द्यायची आणि कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा, याचे धडे मिळाले. ‘मोका सभी को मिलता है,’ असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळातील विरोधकांना सूचक इशाराही दिला.
तालुकानिहाय मतदान झाले असून, कोणत्या भागातून कोणाला किती पाठिंबा मिळाला, याचे चित्र स्पष्ट होत आहे. मोहिते-पाटील पॅनलला नेमकी कोणी मदत केली, हेही लवकरच समोर येईल, असे सांगत गोरे यांनी राजकीय समीकरणांबाबत सूचक विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकीय हालचालींची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या चेअरमनपदाबाबत सर्वजण एकत्र बसून लवकरच निर्णय घेतील. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या कामकाजाचा आठ दिवसांत आढावा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
यांची होती उपस्थिती : यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे-पाटील, राम सातपुते, विजयी उमेदवार मनीष देशमुख, रणजीत शिंदे, महादेव कांबळे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, रणवीर राऊत, दिग्विजय बागल आदी उपस्थित होते.