
फोटो सौजन्य सोशल मिडिया
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत नागरी सुविधांशी संबंधित पाच विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी अतिरिक्त निधीची तरतूद आणि निवारा केंद्र उभारणीचा विषय महत्त्वाचा ठरला. उपलब्ध निधीचे पुनर्विनियोजन करून सुधारित अंदाजपत्रकात निधी उपलब्धतेनुसार तरतूद करण्यास समितीने मान्यता दिली. निवारा केंद्राच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे.
सोलापूर शहरात सध्या सुमारे ३५ हजार भटकी कुत्री असल्याचा अंदाज आहे. त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्बीजीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. मात्र, सध्या दररोज सरासरी केवळ १८ कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होत आहेत. एवढ्या कमी क्षमतेत शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.
या पार्श्वभूमीवर देगाव येथील साडेचार एकर जागेवर निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रत्येकी दहा कुत्र्यांची क्षमता असलेले १०० केज तयार करण्याचे नियोजन असून, एकावेळी एक हजार कुत्र्यांना निवारा मिळू शकेल. निर्बीजीकरण, शस्त्रक्रिया आणि कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
Satara News : सातारा बँक निवडणुकीत बोगस महिला निरीक्षकाचा शिरकाव; पोलिसांनी घेतले ताब्यात
निवारा केंद्राच्या प्रकल्प अहवालानुसार विविध सुविधांसाठी पुढीलप्रमाणे खर्च प्रस्तावित आहे.
डॉग शेल्टर – १,००० कुत्र्यांची क्षमता ३.१२ कोटी
एबीसी सेंटर – २.५० लाख ऑपरेशन थिएटर -५६.५१ लाख
विकासकामे -१.२१ कोटी
विद्युत व्यवस्था _६१ लाख
अग्निशमन यंत्रणा २० लाख ६० कर्मचाऱ्यांची गरज; सध्या आठ जणांवर काम
मोकाट कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या संबंधित विभागात सध्या दोन डॉक्टर आणि चार मदतनीसांसह साधारण आठ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र, मंजूर आकृतीबंधानुसार सुमारे ६० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे केवळ निवारा केंद्र उभारून प्रश्न सुटणार नसून, निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया वाढविण्यासाठी पुरेसे डॉक्टर, कर्मचारी आणि आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
स्थायी समितीच्या सभेत महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी खाद्यपुरवठ्याच्या वर्कऑर्डरची माहिती घेण्यात आली. मे. उन्नती कन्स्ट्रक्शन यांना चिकनसाठी प्रतिकिलो २४० रुपये, म्हैसवर्गीय बीफसाठी २३० रुपये आणि अंड्यासाठी प्रतिनग पाच रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
तसेच विभागीय कार्यालय क्रमांक एक ते आठ आणि मुख्य कार्यालयांतर्गत पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी चार मक्तेदारांचा वार्षिक मक्ता निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली. डीआय आणि एमएस पाइपलाइनची दुरुस्ती, विशेष दुरुस्ती तसेच स्लुईस व्हॉल्व्ह पुरविणे व बसविण्याच्या कामांसाठी सुमारे चार कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक २२ मधील जन्नतुल फिरदोस कब्रस्तानातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या वर्कऑर्डरची माहितीही समितीने घेतली. विभागीय कार्यालय क्रमांक सहाअंतर्गत दैनंदिन देखभाल व किरकोळ दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी श्रीकांत सिद्राम भोळे यांना मंजूर निविदा दराने मक्तेदार म्हणून नियुक्त करून वर्कऑर्डर देण्यास मान्यता देण्यात आली.
एकीकडे मोकाट कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या निधीची तरतूद, तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान आहे. त्यामुळे निवारा केंद्र प्रत्यक्षात उभे राहणे, निर्बीजीकरणाचा वेग वाढणे आणि नागरिकांना या समस्येतून दिलासा मिळणे, याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.