फोटो सौजन्य सोशल मीडिया
विशेष म्हणजे, या महिलेने भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र गळ्यात घालून मतदान केंद्रांमध्ये प्रवेश केला होता. अनेक अधिकाऱ्यांसोबत छायाचित्रेही काढल्याने सुरुवातीला तिच्या ओळखीबाबत कोणालाही संशय आला नाही. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील मतदान केंद्र क्रमांक आठच्या परिसरात पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा कार आली. या कारमधून उतरलेल्या महिलेच्या गळ्यात भारत निवडणूक आयोगाचे नाव असलेले ओळखपत्र होते. आपण निवडणूक निरीक्षक अधिकारी असल्याचे सांगत तिने हे ओळखपत्र दाखवले आणि मतदान केंद्रात प्रवेश केला.
वैशाली अशोक देशपांडे (रा. पाषाण-सुस रोड, पुणे) असे या महिलेचे नाव आहे. तिने केवळ एका मतदान केंद्रापुरती उपस्थिती न ठेवता इतर केंद्रांवरही निरीक्षक अधिकारी असल्याचे सांगून भेटी दिल्याची माहिती समोर आली आहे. अनेक अधिकाऱ्यांसोबत तिने छायाचित्रेही काढली.
Buldhana: दुष्काळात अळीचा घाला! तुरीच्या शेंगा पोखरल्या, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या कोरेगाव उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना महिलेच्या पदाबाबत संशय आला. त्यांनी तिच्या ओळखपत्राची तपासणी केली असता त्यावर ‘इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, २०९ शिवाजीनगर असेंब्ली, पुणे’ असा उल्लेख असल्याचे दिसून आले.
मात्र, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तिची निरीक्षक म्हणून कोणतीही नियुक्ती झाली नव्हती. चौकशीत २०२३ मध्ये पुण्यातील शिवाजीनगर परिसरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करताना हे ओळखपत्र बनवून घेतल्याची माहिती तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेसोबत एमएच १२ वायए ९९९७ क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा कार होती. ही कार भाड्याने घेतल्याचे तिने सांगितले. चालक मारुती छगन एकतपुरे आणि त्याच्यासोबत असलेले तुकाराम शिवलिंग पाटोळे यांचीही माहिती पोलिसांनी घेतली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने महिलेला ताब्यात घेतले. पोलीस हवालदार अजय रामचंद्र झुंजार यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी पुढील तपास करीत आहेत. या प्रकारामुळे निवडणूक केंद्रांच्या सुरक्षेचा आणि ओळखपत्र पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.






