अजित पवार गटाच्या शिंदे सरकारमधील प्रवेशानंतर नाराज असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न खातेवाटपाच्या भाजप पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले असल्याचे मानण्यात येत आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून खाते वाटपावरून गोंधळ सुरू आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर या गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीला खाते देण्यावरून शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपली होती. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला होता.
दरम्यान खाते वाटपावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी पक्षाच्या नेतृत्वाचं कौतुक करताना, सर्व आमदारांना जिंकून आणण्याची जबाबदारी भाजपाची असल्याचंही सांगितलं. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारात सरकारमधील असलेला ताण दूर करण्याचा हा प्रयत्न मानण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदी सामील झालेल्या अजित पवार गटाच्या आमदारांच्या शपथविधीनंतरही खातेवाटप जाहीर झालेलं नव्हतं. अर्थ खात्यासह काही प्रमुख खाती राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाचा विरोध होता. अखेरीस हा वाद थेट दिल्ली दरबारी अमित शाहा यांच्याकडे पोहचला. अजित पवार आणि अ्मित शाहा यांच्यात चर्चा झाली. तीन ते चार दिवसांच्या रात्रीच्या बैठकांनंतर अखेर खातेविस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अजित पवार यांना अर्थ खातं, तर राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांना मोठी खाती देण्यात आलीयेत.
खाते वाटपात कुणाच्या पदरात काय ?
1.अजित पवार – अर्थ मंत्री
2. दिलीप वळसे पाटील – सहकार मंत्री
3. छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
4. धनंजय मुंडे- कृषी
5. अदिती तटकरे- महिला आणि बालविकास
6. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
7. धर्मराव बाबा अत्राम – औषध प्रशासन
8. संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण
9. अनिल पाटील – मदत पुनर्वसन
ही महत्त्वाची खाती मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळात अपेक्षित खाती मिळाली का, या प्रश्नावर तडजोड करावी लागते, असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय.