राजापूर एसटी डेपो समोरील मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हे ठिकाण अपघात क्षेत्र बनले असून याबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठविला. त्यानंतर गुरूवारी राजापूरात आलेले सिंधुरत्न समितीचे सदस्य व रत्नागिरीतील उद्योजक किरण उर्प भैय्या सामंत यांनी या ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ उपाय-योजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील वाटूळ ते पन्हळे या सुमारे 37 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. दुतर्फा वाहतूकही सुरू आहे. मात्र राजापूर शहर हद्दीतील एसटी डेपोसमोर ‘भुयारी मार्ग की जंक्शन’ हा प्रश्न न सुटल्याने येथील रस्त्याचे काम अद्यापही जैसे थे आहे. या ठिकाणी भुयारी मार्ग करावा की जंक्शन करावे यावरून स्थानिकांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे येथील रस्त्याचे काम रखडले असून सध्या या ठिकाणाहून कोणीही कोणत्याही दिशेने वाहन नेत असल्याने हा भाग म्हणजे वाहनचालकांसाठी भुलभुलैया ठरत आहे. त्यामुळे हे ठिकाण सध्या अपघात क्षेत्र बनले आहे.
याबाबत स्थानिक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिध्द करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. याची दखल घेत गुरूवारी राजापुरात आलेल्या किरण सामंत यांनी या ठिकाणी रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तात्काळ योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दिपक नागले, शहरप्रमुख सौरभ खडपे, हनिफ मुसा काझी, अरविंद लांजेकर, विनय गुरव आदींसह नागरीक उपस्थित होते.