एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक; गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांचे हाल, प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष (फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
११ कामगार संघटनाच्या कृती समितीने संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील बहुतेक आगार बंद आहेत. आज ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत २५१ आगारापैकी ३५ आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः किंवा पुर्णतः सुरू आहेत. मुंबईमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फारसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत नाही. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील काही भागात संपाचा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेदेखील वाचा- छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत उपमुख्यमंत्री फडणवीस केव्हा माफी मागणार? परशुराम उपरकर यांचा सवाल
ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक देखील व्यवस्थित सुरु आहे. विदर्भात देखील बंदचा फारसा परिणाम झालेला नाही. पण मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद ठेवण्यात आले आहेत. काही दिवसांवर गणेशोत्सव सुरु होणार आहे. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे. बर स्टँडवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे या संपावर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी आता केली जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपावर प्रशासान काय भुमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आजपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी ठाम भुमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. अकोला, अमरावती आणि अहमदनगर जिल्ह्यात या संपाच परिणाम झाला आहे. अकोला, अमरावती आणि अहमदनगरमधील एसटी बस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांना प्रवासासाठी इतर वाहनांचा वापर करावा लागत आहे. बस स्टँडवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. शिर्डी तसेच संगमनेर डेपोतून धावणाऱ्या बसेस देखील आगारातच उभ्या आहेत.
हेदेखील वाचा-पेणमधील राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरु
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून एसटीला चांगला प्रतिसाद दिला जातो. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यामुळे कोकणात गावी जाणाऱ्या चाकमान्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपावर लवकरात लवकर शासनाने मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये आंदोलन केलं होतं. त्यावेळी सलग 54 दिवस सुरू असलेला संप 20 डिसेंबर 2021 रोजी मागे घेतला होता. त्यानंतर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. याच मागण्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पुकरला आहे.