छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत उपमुख्यमंत्री फडणवीस केव्हा माफी मागणार? परशुराम उपरकर यांचा सवाल
राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलं आहे. राजकारणी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन जनतेची माफी मागितली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी देखील जाहीर रित्या जनतेची माफी मागितली. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर माफी मागितली पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी माफी मागणार, असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.
हेदेखील वाचा- मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी
परशुराम उपरकर म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात अनेक राजकीय पक्षाचे नेते येवून गेले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीर रित्या माफी मागीतली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागीतली नाही. पेशवे शाहीच्या माध्यमातून हे सगळे चालू आहे. त्यामुळेच या प्रकरणात दोषी असलेले पालकमंत्री, कार्यकारी अभियंता, मुर्ती बनवणारा ठेकेदार जयदीप आपटे या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. राजकोट लोकार्पनासाठी हॅलीपॅड बनवण्याची निविदा होण्याआधी कार्यारंभ आदेश कसा दिला?
कणकवली येथील कार्यालयात पत्रकारांशी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले की, छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या विषयावर बोलताना कपाळावर खुण दाखवण्यात आली. त्या खुणेबाबत कृष्णाजी कुलकर्णी हा अफजल खान यांचा वकील होता, अफजल खानाचा कोथळा काढला तेव्हा त्या वकिलाने महाराजांवर वार केला, ती खूण दाखवण्याचा प्रयत्न शिल्पकार जयदीप आपटे यांनी केला. मुळात जयदीप आपटेकडे कुठलीही डिग्री नाही. जे.जे. आर्टसमध्ये तो शिकलेला नाही. मग त्याला कोण पाठीशी घालत आहे? त्याला कोणी लपवले आहे?
हेदेखील वाचा- मोबोक्रसी निर्माण झाली आहे; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा राजकीय नेत्यांना फटकारलं
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना झाल्यानंतर अजयकुमार सर्वगोड गायब झाले आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई होण्याची गरज होती. बांधकामचे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांनी संगनमताने हा घोळ केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री, पालकमंत्री फक्त एकदाच येवून गेले ही खरी शोकांतिका आहे. कार्यक्रम होण्यापूर्वी पालकमंत्री पुढे पुढे नाचत होते, ते कुठे आहेत? पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कार्यकारी अभियंत्याचे निलंबन करावे. पालकमंत्र्यांचा सचिव अनिकेत पटवर्धन याने हे सगळं केलं आहे. त्याची चौकशी झाली आहे. या घटनेत एकाबाजूने माफी मागायची दुसरीकडे कुठलीही कारवाई नाही. ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली आहे.
उपरकर यांनी म्हटलं आहे की, नव्याने पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची गरज होती. आता शासन जागे होवून वयस्कर असलले धुळ्यातील शिल्पकार सुतार यांना आणून त्यांना पुतळा उभारण्याचं काम दिले जात आहे. ते जागतिक कीर्तीचे असल्याने ते वर्षभर तरी पुतळा उभारण्यासाठी वेळ घेतील. कणकवली सार्वजनिक विभागामार्फत राजकोट येथील छत्रपतींच्या पुतळा लोकार्पन व नौदल दिनाच्या निमित्ताने व्हीआयपी व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या हॅलीपॅडची निविदा व अनामत रक्कम घेण्याच्या तारखांमध्ये फरक आहे.
काम करण्यासाठी वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराला निविदा प्रक्रिया पुर्ण होण्या अगोदरच देण्यात आली. हा बांधकाम विभागाचा अजब कारभार आहे. तसेच निविदेच्या 33 टक्क्यांच्या प्रमाणात कामांचे वाटप करताना जी कामे मजुर संस्थांना द्यावयाची होती. त्या कामांबाबत जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांना पत्रव्यवहार न करताच बांधकाम विभागाने 50 लाखांच टेंडर देण्याच काम केल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.