ST Workers Strike
धुळे : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने (ST Workers Union) विविध प्रकारच्या 29 प्रलंबित मागण्यांसाठी 13 सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, यामुळे लालपरीची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या उपोषणाच्या पार्भूमीवर एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश धुळ्यासह राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना दिले आहेत.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी महामंडळाने अनेक मागण्या मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्यापही एसटी महामंडळाने केलेली नाही. त्यामुळे मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी 13 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे.
तत्पूर्वी 11 व 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.