weather (फोटो सौजन्य : social media)
विदर्भात मोसमी पावसापूर्वीच निसर्गाचा तडाखा बसला असून, 11 जून रोजी झालेल्या वादळी पावसाने यवतमाळ, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान
यवतमाळ जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये हाहाकार
यवतमाळ जिल्ह्याच्या यवतमाळ, आर्णी, पुसद, दिग्रस, महागाव, घाटंजी, कळंब, वणी, आणि नेर या 9 तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची व गोठ्यांची पडझड झाली.
एकूण 1815 घरांचे नुकसान झाले असून, त्यापैकी 10 घरे पूर्णतः कोसळली आहेत.10 गोठ्यांचेही नुकसान झाले असून, या नैसर्गिक आपत्तीत 57 जनावरांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
शेतीचंही प्रचंड नुकसान
पावसामुळे 162 हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये विशेषतः केळी, संत्रा, लिंबू, पपई, तीळ, ज्वारी व इतर फळबागा या पिकांचा समावेश आहे. जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत.
वीज पुरवठा खंडित, झाडे कोसळली
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब व तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी नागरिकांना रात्री उघड्यावर काढावी लागली.
दर्यापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात, विशेषतः नांदरुण परिसरात, ढगफुटीसदृश पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तर रामतीर्थ येथे वादळी वाऱ्यामुळे घरांची व झाडांची मोठी पडझड झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
वाशिम जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली. नागरिकांचे अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य भिजले. विशेषतः रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोहिनी नाईक यांचा पाहणी दौरा
पुसद तालुक्यातील गहुली, बांशी, मुंगशी, वनवारला या गावांमध्ये झालेल्या पावसामुळे केळीची शेती उद्ध्वस्त झाली आहे. या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनी घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली.
शासनाकडे तातडीने मदतीची मागणी
या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तातडीने पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
आता रिटायर्ड झालात तरीही नोकरी करता येणार; सरकारी अधिकाऱ्यांसाठी सरकारचा ‘हा’ आहे विशेष प्लॅन