धक्कादायक! 5 महिन्यांत आढळले 16 अनोळखी मृतदेह, पोलिसांसमोर आव्हान
गुन्ह्यांच्या तपासापेक्षा आता बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यातच पोलिसांचा अधिक कस लागत आहे. रेल्वे रुळावर, जंगलात अनेक मृतदेह आढळून येत असून, ते कुजलेल्या अवस्थेत असतात. अशावेळी चेहरापट्टीच स्पष्ट नसताना मृत पावलेली व्यक्ती कोण ? याचे कोडे उलगडण्यासाठी तपास यंत्रणांची कसोटी लागत आहे. गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात अद्यापपर्यंत 16 बेवारस मृतदेह आढळले आहेत. त्यापैकी बहुतांश मृतदेह हे उड्डाण पुलाखाली, रेल्वे रुळावर आढळले असून, बहुतांश मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणांचा तपास करण्यात पोलिस यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे.
बेपत्ता झालेल्या लोकांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला, जंगलात, नदी-नाल्यात आढळतात. बेपता व्यक्तीचे मृतदेह जरी आढळले तरी त्याचा अपघात की घातपात ? या दिशेने पोलिसांना तपास करावा लागतो. त्या व्यक्तीची पार्श्वभूमी आणि परिस्थिती पाहून तपास केला जातो. जराशी चूक मृतदेहाच्या अदलाबदलीला कारणीभूत ठरू शकते. यामुळे बेपत्ता व्यक्तींची माहिती जुळवाजुळव करण्यासह नातेवाइकांकडून त्याची ओळख पटवली जाते. अशावेळी अंगावरील कपडे, दागिने, गोंदण हे देखील पोलिसांना दिशा देतात. काही प्रकरणांत अशा मृतदेहांवरून हत्येचे गुन्हे देखील पोलिसांनी उघड केले आहेत. तर काही प्रकरणात मृत्यूचे कारण स्पष्टच होत नाही.
अनोळखी मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे, हे माणुसकीचे व पुण्याचे कार्य मानले जाते. त्यामुळे पूर्वी काही पोलिस हे स्वखर्चाने कापड, साहित्य आदी लागणारा खर्च स्वतःच्या खिशातून करायचे. परंतु आता शासनाकडून बेवारस मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत निधी मिळतो. शासकीय शवागारात मृतदेह मोफत ठेवला जातो तसेच नगरपरिषद स्मशानभूमीत अंत्यविधी मोफत केला जातो. अनोळखी मृतदेह सापडल्यावर स्थानिक पोलिस पंचनामा करून मृतदेह शवागारात ठेवतात. शवविच्छेदन केले जाते व मृतदेहाची ओळख पटून त्याचे वारस येईपर्यंत 7 ते 15 दिवस मृतदेह शवागारातच ठेवला जातो. अनेक वेळा मृतदेहाची ओळख पटली तरी त्यांचे वारस सापडत नाहीत वा येत नाहीत. जिल्ह्यात जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यांच्या काळात ठिकठिकाणी विविध घटनांत 16 बेवारस मृतदेह पोलिसांना आढळले. मात्र त्यांची ओळख अद्यापही पटविण्यात पोलिस यंत्रणेला यश आले नाही. ओळख पटली नसल्याने त्या घटनांचा तपास देखील रखडला आहे.
अनोळखी मृतदेह आढळल्यास त्याची ओळख पटून त्याचे वारस मिळावेत, यासाठी संबंधित पोलिस तपास करतात. वारस मिळून आल्यास मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जातो. मृत व्यक्तीच्या नातेवाइकांची 10 ते 15 दिवस वाट पाहिली जाते. कोणी वारस सापडला नाही तर पोलिस अनोळखी मृतदेहाचे योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करतात.
किशोर पर्वते, पोलिस निरीक्षक, गोंदिया
कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश अन् गुन्हेगाराचा शोध..! भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला ‘त्या’ खूनाचा छडा
शासकीय शवागारामध्ये अनोळखी मृतदेह 7 दिवसांसाठी ठेवला जातो. त्यादरम्यान ओळख पटून अनोळखी मृत व्यक्तीचे परिचित आले तर ठीक, अन्यथा पोलिसांना मृतदेह योग्य विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले जाते. अनोळखी मृतदेहाची ओळख पटण्याची शक्यता पोलिसांना वाटली तर त्यांच्या सूचनेनुसार आणखी सात दिवसांची मुदत वाढवली जाते. 15 दिवसांनी शवागार विभाग पोलिसांना पुन्हा पत्र देते.