पंढरपूर : आपले गाव सुधारणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडू मात्र केवळ पोलिस कारवाई करून कायद्याच्या धाकाने सुधारणा होणार नाही तर यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे मत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, “मी पंढरपूर पोलीस ठाणे येथील माझ्या पदाचा पदभार स्वीकारून १ वर्षे पूर्ण झाली आहेत. या एक वर्षात जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे करणाऱ्या अनेक लोकांचे मतपरिवर्तन केले आहे. त्यांना चांगल्या व्यावसायाकडे वळवले आहे. मात्र अजूनही काहीजण यातून बाहेर पडायला तयार नाहीत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पंढरपूर तालुक्यातील देगांव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ३० ऑगस्ट रोजी दारूबंदीचा ठराव करण्यात आला आहे. त्यानंतर पाटील यांनी देगांव गावाला भेट देत आढावा घेतला. यावेळी अवैध दारू, तंबाखूजन्य मावा विक्री, तसेच गुटखा विक्री, शिंदी विक्री यासारख्या बंदी असणाऱ्या घटकांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
[read_also content=”टेंभुर्णीत गणेश मंडळांच्या मुस्लीम कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/muslim-worker-of-ganesha-mandal-in-tembhurni-died-of-shock-nrdm-322261.html”]
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, कुणाला जर अवैध दारू, गुटखा विकताना आढळून आले तर त्यांनी कधीही माझ्याशी संपर्क साधावा. अथवा आमच्या कर्मचाऱ्यांना कळवावे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. यातून अवैध धंदे करणाऱ्या लोकांनी बाहेर पडायला हवे मात्र अजूनही अनेक जण यातून बाहेर पडायला तयार नाहीत. यामुळे गावातील अनेक पिढ्या बरबाद होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी व आम्हाला सहकार्य करावे आपल्या सहकार्याने आपण गाव अवैध धंदे व व्यसनमुक्त करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.