तरुणांच्या स्टंटबाजीत विद्यार्थिनीचा मृत्यू; गावी जाण्यासाठी एसटीची पाहत होती वाट, 'ती' कार आली अन्...
भोगावती : भोगावती महाविद्यालय कुरुकली (ता. करवीर) येथून आपल्या गावी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत उभी राहिलेल्या विद्यार्थिनींच्या घोळक्यात अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार थेट मुलींच्या अंगावर घातली. यामध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत. या अपघातामध्ये कौलव (ता राधानगरी) येथील प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रज्ञाच्या अपघाती मृत्यूने कौलव गावावर शोककळा पसरली आहे.
करवीर तालुक्यातील कुरुकली येथे गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कॉलेज सुटले. भोगावती महाविद्यालयापासून अर्धा किलोमीटरवर असणाऱ्या एसटी थांब्यावर राधानगरी आणि कोल्हापूरच्या दिशेने गावी जाण्यासाठी एसटीची वाट पाहत 50 हून अधिक विद्यार्थी होते. भोगावती महाविद्यालयाकडून बस थांबाकडे स्टंटबाजी करण्याच्या नादात कार (एमएच बीबी ५९०७) या गाडीतून काही अल्पवयीन मुलांनी राधानगरी-कोल्हापूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मुलींच्या घोळक्यामध्ये गाडी घातली. यामध्ये चार मुलींना गाडीने जोराची धडक दिली आणि काही अंतरावर रस्त्यावरून फरपटत नेले.
हेदेखील वाचा : Nashik News : हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले आणि परतत असतांना वाटेत भीषण अपघात; दोन मित्रांचा जागीच मृत्यू
अचानकपणे झालेल्या या अपघाताने घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता गाडी भोगावतीच्या दिशेने सुसाट पळवली. मात्र, उपस्थित असणारे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकाने गाडीचा पाठलाग केला आणि भोगावती ठीकपुर्ली फाट्यानजीक या गाडीला पकडले. गाडीमध्ये असणाऱ्या चार मुलांपैकी दोन मुलांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. तर चालक राजवर्धन सुरेश परीट (रा. राशिवडे) या अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला पोलिसांच्या ताब्यात दिले.
विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेली कौलव (ता. राधानगरी) येथील बीएससीच्या पहिल्या वर्षी शिकत असलेली प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भोगावती महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्टंटबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चुकीमुळे या निष्पाप मुलीचा बळी गेल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
हेदेखील वाचा : Hotel Bhagyashree News: खळबळजनक! ‘हॉटेल भाग्यश्री’ च्या मालकाचे अपहरण करून बेदम मारहाण; मालकाने सांगितली आपबिती