
कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक, नितीन सावंतांना सोबत घेत थोरवे आणि लाड यांना धक्का
कर्जत नगरपरिषद निवडणुक अतिशय अटितटीचा सामना होता. आमदार थोरवे आणि माजी आमदार लाड यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची होती. राज्यात शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीत सोबत असले तरी जिल्ह्यात आणि कर्जत खालापूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद आहेत. आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही हे निवडणुकीआधी जाहीरपणे सांगितले होते. निवडणुकी दरम्यान थोरवे आणि लाड यांनी एकत्र येत लाड यांच्या सुनबाई स्वाती लाड यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी घोषित केली होती.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत यांनी एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी स्थापन करत राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले होते. माजी आमदार लाड यांच्या सुनबाई स्वाती लाड रिंगणात असल्याने ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली होती. परंतू, सुधाकर घारे यांनी देखील प्रभाग निहाय नियोजन करत थोरवे लाड यांना कर्जत मध्ये थोपवत विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. नितीन सावंत यांच्यासोबत आघाडी करत कर्जतच्या राजकारणात त्यांनी मोठा बदल घडवून आणला असल्याचे बोलले जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीपासून सुधाकर घारे यांनी कर्जतमधील गुंडगिरी आणि रखडलेल्या विकासाच्या मुद्दयावर भर देत पारदर्शक लोकाभिमूख कारभार आणि सर्वांगीण विकास हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले होते. विधानसभेला लाड यांनी शेवटच्या क्षणी थोरवे यांना पाठींबा दिला होता. त्यावेळी घारे यांचा निसटता पराभव झाला. मात्र कर्जतच्या प्रश्नांवर कायम राहत नगरपरिषदेच्या निवडणुकीत देखील घारे यांनी याच मुद्द्यांवर भर दिला. नितीन सावंत यांची देखील साथ त्यांना मिळाली. कर्जत नगरपरिषदेत मिळालेला विजय हा सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक मानले जात आहे.
पुष्पा दगडे यांनी महायुतीच्या उमेदवार स्वाती लाड यांचा पराभव करत ४४७० मतांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण २१ नगरसेवकांपैकी परिवर्तन विकास आघाडीला १३ जागा मिळाल्या असून महायुतीला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, शिवसेना ठाकरे गटाचे ४ आणि १ अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे ७ आणि भाजपचा १ नगरसेवक निवडून आला आहे.