Eknath Shinde News: स्वबळावर लढत देत शिंदे शिवसेनेचा मोठा स्ट्राइक रेट; ५० हून अधिक नगराध्यक्षपदे जिंकली
शिवसेनेने आपल्या इतिहासात पहिल्यांदाच सुमारे १३५ जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी ५० हून अधिक नगराध्यक्षपदे शिवसेनेच्या पदरात पडली आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत शिंदे गटाला पाच पट अधिक यश मिळाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची एकत्रित कामगिरीही शिंदे यांच्या शिवसेनेच्या यशापुढे फिकी ठरली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व तळागाळात स्वीकारले गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करत आपली स्वतंत्र ताकद दाखवून दिली आहे. कोकणात मंत्री रवींद्र चव्हाण तसेच डहाणू-पालघरमध्ये गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या प्रभावाखालील भागांत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. कणकवली आणि मालवण या दोन्ही प्रतिष्ठेच्या ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले आहे. सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकट्याने लढत देत विरोधकांचा क्लीन स्वीप केला. महाडमध्ये भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने भगवा फडकवला.
मी मतदारांचे आभार मानतो. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची हाफ सेंच्युरी झाली. काहीजण म्हणत होते शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, पण आता शिवसेना चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहचली आहे.
– एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. शिवसेनेच्या हर्षदा पाटील आणि त्यांचे पती राहुल पाटील यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे व त्यांच्या पत्नीचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला, हा निकाल पालकमंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठे यश मानले जात असून, भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांच्या वर्चस्वाला यामुळे स्पष्ट तडा गेल्याचे बोलले जात आहे. या निकालांमुळे राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाला एक स्वतंत्र आणि प्रभावी शक्ती म्हणून पुढे आल्याचे स्पष्ट झाले आहे.






