"OYO हॉटेलमध्ये तासाभरासाठी खोल्या भाड्याने दिल्या जातात"; मुनगंटीवारांची सभागृहात चौकशीची मागणी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात OYO हॉटेलचा मुद्दा उपस्थित झाला. हॉटेलच्या साखळीवर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खळबळजनक आरोप करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. देशभरातील तसेच महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांवर OYO शी संलग्न असलेल्या हॉटेल्समध्ये अनियमितता आणि संशयास्पद व्यवहार होत असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं.
पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी बोलताना मुनगंटीवार यांनी OYO हॉटेलच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितलं, “शहरांपासून २०-२० किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी OYO हॉटेल्स सुरू असल्याचं दिसून येतं. ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ही हॉटेल्स चालू असावीत, याबाबत सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे.”
तसंच, या हॉटेल्समध्ये खोल्या तासाभरासाठी भाड्याने दिल्या जात असल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. “इतक्या दूर कुठलाही सामान्य प्रवासी राहण्यासाठी जाणार नाही. कारण टॅक्सीचा खर्च आणि इतर बाबी पाहता शहरातच राहणं परवडतं. पण तरीही काही लोक OYO मध्ये जातात. यामागे कोणतं अर्थशास्त्र आहे, याचा अभ्यास पोलीस विभागाने करायला हवा.”
“महाराष्ट्रात सध्या संस्कृतीरक्षकांचं सरकार सत्तेत आहे. अशा परिस्थितीत जर राज्यात संस्कृतीचं अधःपतन होत असेल, तर गृहराज्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून या OYO हॉटेल्सबाबत सविस्तर माहिती द्यावी आणि त्याची चौकशी करावी,” अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.