
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्वच्छता सेवा’ मोहिमेचा एल्गार
या अभियानादरम्यान शहरातील गर्दीची सार्वजनिक ठिकाणे, चौक, बाजारपेठा आणि रहिवासी परिसरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. केवळ रस्ते झाडण्यापुरते मर्यादित न राहता शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, विद्यार्थ्यांची मानवी साखळी, सामूहिक स्वच्छता शपथ तसेच ‘स्वच्छ पाठशाळा’ यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. शहराच्या आरोग्याची अहोरात्र काळजी घेणाऱ्या सफाई मित्रांसाठी विशेष कल्याणकारी उपक्रम आणि टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक पुनर्वापर (वेस्ट टू आर्ट) करून सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण करण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
कचरा व्यवस्थापन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी घरातूनच कचरा वेगळा करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य (हॅझार्डस) अशा चार स्वतंत्र प्रकारांत कचऱ्याचे वर्गीकरण करून तो थेट महापालिकेच्या घंटागाडीकडे सोपवावा; रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कचरा फेकू नये, असे आवाहन प्रशासनाकडून विविध माध्यमांद्वारे सातत्याने केले जात आहे.
“स्वच्छता ही तात्पुरती मोहीम किंवा औपचारिकता न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनायला हवी. ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेद्वारे हाच संदेश तळागाळापर्यंत पोहोचवून लोकसहभाग वाढवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. सुंदर आणि निरोगी पिंपरी-चिंचवडसाठी प्रत्येक शहरवासीयाने स्वतःहून स्वच्छतेचा वसा घ्यावा.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महापालिका
“निरोगी शहराचा पाया हा नागरिकांच्या चांगल्या सवयींवर आधारलेला असतो. कचऱ्याचे शास्त्रोक्त वर्गीकरण करून तो पालिकेच्या संकलन यंत्रणेला देणे आणि सार्वजनिक जागा स्वच्छ राखणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. सर्वांच्या सामूहिक सहकार्यातूनच आपले शहर देशात अव्वल ठरेल.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
बाबा भिडे पुलावर लाकडी सुरक्षा कठडे उभारले
पुणे- डेक्कन परिसरातील बाबा भिडे पुलावरील मेट्रोच्या कामासाठी रेलिंग काढण्यात आले होते. गणेशोत्सव काळात होणारी प्रचंड गर्दी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी बाबा भिडे पुलावर संरक्षक कठडे उभारण्याची मागणी नगरसेवक सुनील पांडे यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. महापालिका प्रशासनाकडून आता बाबा भिडे पुलावर तात्पुरत्या स्वरूपात लाकडी सुरक्षा कठडे उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सवात या पुलावरून मोठ्या प्रमाणात भाविकांची आणि गणेश मंडळांच्या मिरवणुकांची वर्दळ असते. पुलाच्या दोन्ही बाजूंना कठडे नसल्याने अपघाताचा धोका होता. सुनील पांडे यांच्या मागणीनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत हे कठडे उभारल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.