कवठे एकंदला दारू कामात स्फोट; एक गंभीर
तासगाव: तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात रविवारी दुपारी शोभेचे दारूकाम करताना झालेल्या स्फोटाने गाव दणाणून गेले. सुतार गल्ली परिसरातील या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यापैकी १६ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गावभर भीती व धाकधूक पसरली असून दसर्यापूर्वीच या अपघाताने गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सुतार गल्ली येथील सार्वजनिक मंडळाकडून दसर्याच्या तयारीसाठी पारंपरिक शोभेचे दारूकाम बनवण्याचे काम सुरू होते. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक दारू कामाचा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरवर पोहोचला आणि क्षणातच परिसर धुराने गुदमरून गेला. गावकऱ्यांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले.
या स्फोटात आशुतोष बाळासाहेब पाटील (वय १६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आनंद नारायण यादव (५५), विवेक आनंदराव पाटील (३८), गजानन शिवाजी यादव (२९), अंकुश शामराव घोडके (२९), प्रणव रवींद्र आराध्ये (२२), आणि ओमकार रवींद्र सुतार (२९) हे किरकोळ भाजले आहेत.
Firecracker Factory Blast: मोठी बातमी! फटाक्यांच्या अवैध कारखान्यात भीषण स्फोट; 6 कामगार ठार
जखमींना तातडीने उपचारार्थ सांगलीला हलवण्यात आले. घटनास्थळी तासगाव पोलीस तत्काळ दाखल झाले आणि पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे. दारूकामाचा स्फोट नेमका कसा झाला, सुरक्षा नियम पाळले गेले होते का, याबाबत तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कवठे एकंदमध्ये दरवर्षी दसरा निमित्त मोठ्या प्रमाणात शोभेचे दारूकाम केले जाते. परंतु यावर्षी तयारीदरम्यानच घडलेल्या या स्फोटामुळे गावातील उत्सवी वातावरणावर काळोख दाटला आहे. अचानक घडलेल्या अपघातामुळे परिसरात धावपळ उडाली, काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा कामांसाठी योग्य सुरक्षा उपाययोजना व प्रशिक्षणाशिवाय दारूकाम करू नये, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडू शकतात.