मोठी बातमी ! आता शिक्षक भरती होणार पारदर्शक; संस्थाचालकांच्या हातात केवळ 10 गुण (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या उमेदवारांची २७ हजार १४५ प्राधान्यक्रमांवर शिफारस झाली आहे. संबंधित मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणी ३ ते २५ नोव्हेंबरदरम्यान पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
२५ नोव्हेंबरपर्यंत मुलाखती पूर्ण होणार
निवड प्रक्रियेत शिफारस झालेल्या उमेदवारांना तसेच संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून निवडीची स्थिती पाहता येणार आहे. तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवता यादी संकेतस्थळाच्या होमपेजवरील ‘डाउनलोड’ मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नियोजन करण्याचे निर्देश दिले नियुक्ती प्राधिकाऱ्यांना
शासन निर्णयातील तरतुदीनुसार ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
तक्रारींसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीसंदर्भात तक्रारींच्या निवारणासाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित नमुन्यातील तक्रारी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra२०२५grcc@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
१. महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत कोणता बदल करण्यात आला आहे?
शिक्षक भरती प्रक्रियेत गुणांचे निश्चित निकष ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे.
२. शिक्षक भरतीमध्ये संस्थाचालकांच्या हातात किती गुण असणार आहेत?
संस्थाचालकांच्या हातात मुलाखतीसाठी केवळ १० गुण असणार आहेत.
३. उर्वरित ९० गुण कोणत्या निकषांवर दिले जाणार आहेत?
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुण, व्यावसायिक अर्हता आणि शैक्षणिक अर्हता या निकषांवर ९० गुण दिले जाणार आहेत.






