सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण
पावसाचे थेंब थेंब पाणी व्यर्थ न वाहू देता ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय प्राथमिक शाळेचा परिसर विस्तारित असल्यामुळे पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अनेक महिने चिखल राहत असे. या समस्येवर मात करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी पुढाकार घेतला आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन परिसराचा कायापालट केला.
यासाठी कोणतीही यात्रिक किंवा कंत्राटी मदत न घेता, गटविकास अधिकारी उदय जाधव यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याऱ्यांनी स्वतः पुढे येऊन श्रमदान केले. या उपक्रमाच्या अमलबजावणीत विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे, संदीप पवार, अमोल माटकर, कृषी विस्तार अधिकारी जयश्री भोसले, कनिष्ठ सहाय्यक जीवन खरावने यांच्यासह नितीन लोखंडे, नारायण गाडेकर, प्रतीक चव्हाण, दत्तात्रय म्हस्के, प्रवीण चंदन, दत्ता काळे, नारायण काळे, दत्तात्रय पडघन, आर. डी, काळे, विक्रम खिल्लारे, देंगे आणि सचिन नगर आदींनीसहभाग नोंदविला.
शासकीय कार्यालयांच्या परिसरात अशा प्रकारच्या उपाययोजना राबविल्यास जलसंवर्धनाला अधिक व्यापक स्वरूप देता येऊ शकते, असा आदर्श सेलू पंचायत समितीने संपूर्ण जिल्ह्यासमोर ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.






