मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंमधील जवळीकता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जवळपास वीस वर्षांपासून एकमेकांपासून दूर होते. पण अलीकडे त्यांच्यातील हा दुरावा चांगलाच कमी झालेला दिसत आहे. अनेक दिवसांनंतर आज (५ ऑक्टोबर) एका कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधुं एकत्र दिसले. हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील एमसीए क्लबमध्ये झालेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण समारंभानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले होते.
उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत या कार्यक्रमाला पोहोचले होते. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे देखील त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही ठाकरे बंधूंना एकाच व्यासपीठावर पाहून कार्यक्रमातील उपस्थितांना आश्चर्य वाटले, तर या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे दोन्ही भाऊ अलीकडेच समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही; गेल्या तीन महिन्यांत ही त्यांची पाचवी भेट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी संभाव्य युतीबाबत शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यात चर्चा सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही ठाकरे बंधुंच्या वारंवार होणाऱ्या भेटी पाहता भूतकाळातील मतभेद बाजूला ठेवून नवीन भागीदारीकडे वाटचाल करत आहेत हे स्पष्ट होते.
Bihar Election 2025: कधी होणार बिहार विधानसभा निवडणुका? निवडणूक आयुक्तांनी स्पष्टचं सांगितलं
५ जुलै २०२५ रोजी, दोन्ही भाऊ एका मराठी भाषेच्या महोत्सवात मंचावर एकत्र दिसले.
२७ जुलै २०२५ रोजी, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले.
२७ ऑगस्ट २०२५ रोजी, उद्धव ठाकरे यांनी दोन दशकांत पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या गणेशोत्सवाला हजेरी लावली.
१० सप्टेंबर २०२५ रोजी, गणेश मुहूर्ताच्या वेळी दोघांची आणखी एक औपचारिक भेट झाली.
आज, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्र दिसले. या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.राजकीय वर्तुळात चर्चा आहे की ठाकरे बंधू आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवू शकतात. जर असे झाले, तर महाराष्ट्राचे विद्यमान राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते. ठाकरे बंधूंची वाढती जवळीक ही केवळ कौटुंबिक नाही, तर येत्या निवडणुकीत नव्या आघाडीच्या शक्यतेचा इशारा देणारी ठरू शकते.