मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आली आहेत. शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटाने प्रचार गीत प्रसिद्ध केले. मात्र ठाकरे गटाच्या प्रचारगीताचा मुद्दा चर्चेमध्ये आला आहे. निवडणूक आयोगाची टांगती तलवार ठाकरे गटाच्या प्रचारगीतावर आहे. निवडणूक आयोगाने बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. हा अर्ज राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळल्याची माहिती समोर येत आहे.
नोटीसमध्ये काय म्हटलंय?
ठाकरे गटाच्या प्रचार गीतावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला होता. आयोगाने बजावलेल् नोटीसमध्ये कोणत्याही धार्मिक शब्दाचा उल्लेख असू नये असे सांगण्यात आले आहे. यामध्ये’जय भवानी’ शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने ‘जय भवानी’ या शब्दावर आक्षेप घेतल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने २४ एप्रिल २०२३ रोजी एक सूचना जारी केली. यामध्ये विविध कारणांसाठी काही पक्षांना ३९ नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा देखील समावेश आहे.
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या प्रचार गीतावर आक्षेप घेतल्यानंतर ठाकरे गटाने जोरदार नकार केला. उद्धव ठाकरेंनी दोनवेळा आपल्या भाषणातून ‘जय भवानी’ शब्दावर आक्षेप घेतला असला तरी आम्ही तो बदलणार नाही, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. आपल्या मतावर ठाम राहत ठाकरे गटाकडून फेरविचार अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज देखील आता निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यामुळे आता ठाकरे गटाकडून फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.