छत्रपती संभाजीनगर – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीसह महायुतीने प्रचारासाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधून विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच इम्तियाज जलील यांच्या भेटीबाबत देखील चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट मत मांडले.
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रामाणिक
छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभा मतदारसंघाबाबत देखील उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मत मांडले. चंद्रकांत खैरे म्हणाले, “छत्रपती संभाजी नगर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व समाजाचा मी उमेदवार आहे. मी पाच वर्षे या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. सर्व समाजाने मला पाठिंबा दिला आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रामाणिकपणे लोकांची सेवा करीत राहील. विकासाच्याबाबत बोलायचे झाले तर दिल्लीमध्ये सर्वांशी बोलणे आणि ओळख परिचय आहेत. या भागातील विकासांची कामं, नागरिकांचे काम ही मी प्रामाणिकपणे करणार आहे. कोणाचा फोन दोन वाजता असे किंवा तीन वाजता आला तरी मी तो घेतला आहे आणि त्यांचे काम केले आहे ही माझी पद्धत आहे. आता तर मी पूर्ण जोमाने काम करेल. आतापर्यंत मी निवडणुका लढलो, जिंकलो परंतु असे वातावरण मी बघितलेले नाही आणि नागरिकांच्या अपेक्षा मी पूर्ण करणार आहे, त्यामुळे मी नागरिकांच्या समस्यांची नोंद करून घेतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज काँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी हे सर्व पक्ष आज सोबत आहेत म्हणून मैदानात कोणीही येऊ द्या त्याला पाडणार म्हणजे पाडणार” असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.
मी कशाला त्यांची गळा भेट घेऊ
इम्जियाज जलील यांच्या भेटीबाबत देखील माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न केला. यावर उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, “मला एकदा कमिटीने निमंत्रित केले तर मला गेले पाहिजे. या आधी खासदार असताना सुद्धा ईदगाह मध्ये गेलो आहे. 28 वर्षे मी आमदार, नगरसेवक राहिलो परंतु या जिल्ह्यामध्ये दंगली होऊ दिल्या नाहीत. यामधून साधारण व्यक्तीला मोठा फटका बसतो हे मी लोकांना पटवून दिलं आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे ही भूमिका माझी आहे. मी गळाभेट घेतलेली नाही जो उमेदवार पडत आहे त्याची मी गळाभेट कशाला घेईल. सगळे मुस्लिम बांधव त्यांच्या विरोधात आहे आणि मी कशाला त्यांची गळा भेट घेऊ मला सर्व त्या ठिकाणी म्हणून परंतु मी गळाभेट घेतलेली नाही” असे स्पष्टीकरण चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे.