
इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय
चौगुले म्हणाले, महाविकास आघाडी प्रणित स्थानिक शिवशाहू विकास आघाडी तर्फे भाजपा विरुद्ध एकजुटीने लढण्यासाठी एकी केली होती. मात्र प्रत्यक्ष सन्मानजनक जागा देण्याऐवजी आम्हाला नगण्य जागा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आम्ही संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्याशी बोलणी केली आणि त्यांच्या आदेशाने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. आमचा गट नाही. आमचा पक्ष आहे, हे आम्ही स्पष्ट केले आहे. आमचा कार्यकर्ता हा चळवळीतील असून, त्यांना न्याय देणे गरजेचे आहे.
विविध प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, वेळ अल्प आहे. आम्ही जास्तीत जास्त जागा लढवणार आहोत. शिव शाहू आघाडीत केवळ एक दोन जागांवर बोळवण होणार असल्याने त्यांच्याशी बोलणी बंद करून वेगळा निर्णय घेतला आहे. जागा मागणीबाबत आम्ही कधीही आग्रही किंवा हट्टी नव्हतो. पण याबाबतची कोंडी फुटलीच नाही. आमच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने नेत्यांच्या आदेशानुसार वेगळे होण्याचा निर्णय आम्ही केला असेही त्यांनी सांगितले. आणि शिवसैनिकांनी शिवबंधन बांधून घेऊन मशाल हाती घ्यावी, असे आवाहनही केले.
यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, युवा सेना शहर प्रमुख सागर जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख अभिजीत लोले, युवा शहर समन्वयक रतन वाझे व संतोष लवटे यांच्यासह अन्य शिवसैनिक हजर होते.