ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गणेशोत्सवाच्या काळात कृत्रिम तलाव पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेली होती. मात्र आता हीच कृत्रिम तलावं नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. विसर्जनाच्या साठलेल्या पाण्यामुळे आजारपणाला आमंत्रण मिळत असल्याचं आता समोर येत आहे. ठाण्यात डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढत असतानाच, महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी उभारलेले कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनर आता डासांचं केंद्र ठरत असल्याची भीती व्यक्त होत आहे. विसर्जनानंतर साचलेले दूषित पाणी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी आहे.
विसर्जनाच्या काळात अनेक तलाव रिकामे पडले, तर काही ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर पाणी दूषित अवस्थेत आहे. काही कंटेनरमध्ये तर या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास सुरू होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधीच ठाण्यात डेंग्यू व मलेरियाने शेकडो नागरिक त्रस्त असताना, महापालिकेच्या या ‘पर्यावरणपूरक प्रयोगा’मुळे मात्र आता परिसरात साथीचे आजार वाढत असल्याचं दिसून आलं आहे.
विसर्जनानंतर तलाव व कंटेनर त्वरित रिकामे करून निर्जंतुकीकरण केले गेले नाही, तर ‘पर्यावरणपूरक’ या नावाखाली हा प्रयोग ठाणेकरांच्या आरोग्यासाठी ‘घातक’ ठरेल. नागरिकांच्या कररुपी पैशांतून उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात जास्तीचे आजार ओढवून घेण्याचे कारण ठरतेय, हे दुर्दैवी असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
महापालिकेने विसर्जनाची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर लगेचच ही तळी व कंटेनर रिकामे करून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. मात्र, वास्तवात ते दिवसन्दिवस तसेच पडून राहिले आहेत. नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन गंभीरपणे दखल घेताना दिसत नाही.
ठाण्यात गेल्या काही आठवड्यांत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच या टाक्यांमधील साचलेले पाणी डासांच्या अळ्या वाढवणार हे उघडच आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या आजारांचा फैलाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप असून, “महापालिका पर्यावरणाच्या नावाखाली खेळ मांडतेय, पण शेवटी त्रास मात्र आम्हा ठाणेकरांनाच सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे.
शासन व महापालिकेने जर खरोखरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साध्य करायचा असेल, तर केवळ दिखाव्यापुरत्या सुविधा न उभारता त्याची वैज्ञानिक व परिणामकारक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा ‘पर्यावरणपूरक’ या नावाखाली ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा ठपका येत्या काळात प्रशासनावर ठेवला जाईल, असं (पर्यावरण अभ्यासक ठाणे येथील डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितलेलं आहे.