Thane News: शहरातील पाणी साचणाऱ्या भागांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कडून पाहणी
अतिवृष्टीमुळे ठाणे शहराला नेहमीच फटका बसत असतो. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल तर होतातच. मात्र, याव्यतिररिक्त आरोग्यासंबंधित समस्या देखील वाढते. पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. साचलेले पाणी तत्काळ नाल्यांमध्ये सोडण्यासाठी पंप बसवून ते कार्यरत ठेवावेत तसेच पावसाळी गटारांची पुन्हा सफाई करून जलनिचरणाची क्षमता वाढवण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे, शंकर सांगळे आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते. आयुक्तांनी विटावा सबवे, पेढया मारुती परिसर, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज परिसर, चिखलवाडी, भांजेवाडी, ज्ञानसाधना महाविद्यालय आदी सखल भागांची तपासणी केली.
विठ्ठल मंदिराच्या दर्शनातील घुसखोरी थांबणार…; दर्शन रांगेला लोखंडी तारेची जाळी लावण्याचा निर्णय
विटावा सबवे येथे बसवण्यात आलेल्या ४० एचपी क्षमतेच्या पंपाची पाहणी करताना, त्या ठिकाणी २४ तास कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. हवामान खात्याकडून मिळणाऱ्या इशाऱ्यानुसार आणि भरतीच्या वेळा लक्षात घेऊन पंप सुरु ठेवण्याचेही आदेश दिले.
पेढया मारुती परिसरात साचणाऱ्या पाण्यासाठी क्रॉस कल्व्हर्टची स्वच्छता आणि २४ तास पंप चालू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. वंदना एस.टी. डेपो परिसरातही जलसंचयन टाळण्यासाठी पंपांची व्यवस्था असून, अतिवृष्टीच्या काळात मनुष्यबळही ठेवण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.
चिखलवाडी भागात अस्तित्वात असलेल्या पंपाची पाहणी करताना, पावसात हे पंप पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खात्री करण्यास सांगितले. नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यावर त्यांनी भर दिला.
महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ३०० किमी नाल्यांची सफाई केली असून, ड्रेनेज यंत्रणेची मशीनद्वारेही स्वच्छता केली जात आहे. सध्या महापालिका हद्दीत ३४ सखल भाग असून त्यातील १४ ठिकाणी थोड्या पावसातही पाणी साचते. त्यामुळे अशा ठिकाणी ६४ पंपांची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
अतिवृष्टीच्या वेळी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व अधिकारी सतर्क राहावेत, असे स्पष्ट निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी दिले.