पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन रांगेत 6 फूट जाळी बसवण्यात आली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
पंढरपूर : नवनाथ खिलारे – लवकरच आषाढी वारी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांना जलद आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर, आता दर्शन बारीला लोखंडी तारेच्या जाळी बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे वारीकाळात दर्शन रांगेत होणाऱ्या घुसखोरीला आळा बसण्यास मदत होणार आहे. सध्या एक लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात येत असून, दर्शनाची रांग पत्राशेडपर्यंत पोहोचत आहे.
भाविकांचे जलद आणि सुलभदर्शन होण्यासाठी, मंदिर समितीने दररोज होणाऱ्या ८० तुळशी पूजा कमी करून त्या फक्त १० करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर्शनाचा अवधी किमान एक तासाने कमी झाला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आणि दर्शनासाठी लागणारा कालावधी आणखी कमी करण्यासाठी मंदिर समितीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे वशिल्याने दर्शन देण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली आहे.
पंढरपूर दर्शनबारीत घुसखोरी होऊ नये यासाठी बसवण्यात आलेल्या जाळीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू झाली आहे. या निर्णयामुळे पहिल्याच दिवशी भाविकांना मोठा दिलासा मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. विणे गल्ली ते पत्राशेड या दर्शन रांगेला साधारण सहा ते सात फूट उंचीचे जाळी बसवण्यात आले आहेत. यामुळे दर्शन रांगेतील घुसखोरीला शंभर टक्के आळा बसेल, असा दावा मंदिर समितीने केला आहे.
तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर पंढरपुरातही विठ्ठल दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. येत्या १५ जून रोजी प्रायोगिक तत्वावर पहिली टोकन चाचणी घेण्यात येणार असून, पहिल्या दिवशी १२०० भाविकांना दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे. टोकन दर्शनासाठी बुकिंग करण्यासाठी शहरातील विविध भागात बुकिंग केंद्रे सुरू करण्यात येतील. या सुविधेमुळे भाविकांना दिलेल्या वेळेत दर्शन मिळणार असून, किमान दोन तासात दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांनी या ऑनलाईन टोकन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे.
दर्शनासाठी येणारा सर्वसामान्य भाविक केंद्रस्थानी ठेवून मंदिर समितीने दर्शन व्यवस्था केली आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे यासाठी विशेष प्राधान्य दिले जात आहे. तुळशी पूजा कमी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर व्हीआयपी दर्शन देखील बंद केले आहे. शिवाय, दर्शनरांगेत घुसखोरी थांबवण्यासाठी जाळी गार्ड बसवले आहेत. दर्शनबारी संदर्भात आणखी काही सूचना असतील, तर त्या मंदिर समितीला लेखी स्वरूपात द्याव्यात. प्राप्त सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल, असे मत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
Web Title: 6 feet net in the darshan queue at pandharpur vitthal rukmini temple