ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजातील भोंगळ कारभार सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी उघड केला आहे. 17ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट दाखवून दिले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या एसओपी (SOP) नियमांचे पालन होत नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या घोटाळ्याचा संशय आहे.
माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या कागदपत्रांनुसार, टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स व पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत. अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्यांची पडताळणी करणे अशक्य ठरले आहे. उदाहरणार्थ, सलीम पठाण नावाच्या कामगाराचा पत्ता सहार अपार्टमेंट, लोकमान्य नगर, फ्लॅट 503 असा दाखवला गेला होता, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी गणेश निषाद यांचा परिवार राहतो. त्याचप्रमाणे, कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, कसारवडवली येथे 8 जणांचा पत्ता एकच, तर मुंब्रा–कौसा येथे 7 जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या सर्व घटनांमधून हे स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणावर बनावट कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तयार करण्यात आले आहेत. पोलिस पडताळणी ही संबंधित व्यक्तचा खरा पत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केली जाते, मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांच्या खरी ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे झाकले गेले असावेत, असा गंभीर संशय आहे.
या प्रकरणाची थेट जबाबदारी ठाणे पोलिस प्रशासन व वाहतूक विभागाचे डीसीपी पंकज शिर्सत यांच्यावर निश्चित असल्याचे अजय जया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून संशयास्पद टोईंग कामगारांना निलंबित करण्याची तसेच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अजय जया यांनी हेही स्पष्ट केले की नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक विभागाने टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व SOP नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही, उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.