कल्याण : दरवर्षी पावसामुळे रस्त्यांची कायमच चाळण झाल्य़ाच दिसून येतं. याला अपवाद कल्याण डोंबिवली महानगरपालिका देखील नाही. पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे. त्यामुळे नागरीक आणि वाहन चालकांसह प्रवासी हैराण झाले आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याच्या झालेली दुर्दशा नागरिकांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत होती. आता नागरिकांच्या याच समस्येवर शिंदे गटामुळे तोडगा निघाला आहे.
रस्त्यांच्या दुर्दशेप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी इशारा दिला आहे. निलेश शिंदे म्हणाले की आताच हात जोडतो जर वेळेत रस्ते दुरुस्त झाले नाही तर हात सोडणार असा इशारा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दोन दिवसांपूर्वी दिला होता. शिवसेना शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला जोरात सुरुवात करण्यात आली आहे.
पावसामुळे रस्त्यावरील खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरीक हैराण आहे. नागरीकांसह प्रवासी आणि वाहन चालकांकडून रस्त्यावरील खड्डे प्रकरणी महापालिका आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सातत्याने संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावरील खड्ड्याप्रकरणी नागरीकांकडून लोकप्रतिनिधींना विचारणा केली जाते. त्यांना काय उत्तर देणार ? असा प्रश्न लोकप्रतिनिधीं पुढे आहे. नागरीकांची समस्या लक्षात घेता रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली होती.
त्यांच्यासोबत एक बैठकही यावेळी पार पडली. या बैठकीत शिवसेना शहर प्रमुख शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी रस्त्यावरील खड्डे भरले जात नसल्याने प्रशासनावर चांगलीच आगपाखड करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. पावसामुळे खड्डे भरण्याचे काम थांबले आहे. पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे भरण्याच्या कामाला गती दिली जाईल असे आश्वासन आयुक्त गोयल यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले होते. शिवसेनेने प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्या पश्चात रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला जोरात सुरुवात झाली आहे.