फोटो सौजन्य- प्रतिनिधी
विजय काते/ भाईंदर :- मीरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांनीही या परिसरात पाणी येत नाही. हे कमी की काय स्थानिकांना या पाण्यात जीव जंतू आणि किडेही दिसत आहे. पाण्याच्या वेळापत्रकामध्येही बदल करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.त्यांनी पालिकेला ही समस्या सोडवण्यची विनंती केली असून जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे.
पाण्याची समस्या गंभीर, लोक पडत आहेत आजारी
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा गावठाण महाजन वाडी परिसरात पिण्याच्या पाणीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. स्थानिक नागरिकांना गढूळ व गटाराचा वास येणारे पाणी पुरवठा होण्यामुळे त्रास होत आहे. अनेक दिवसांपासून पाण्यामध्ये जीवजंतू व किडेही दिसत आहेत, तसेच पाणी दोन दोन दिवस येत नसल्याने नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.त्याचबरोबर, पाणी पुरवठ्याचे वेळापत्रकही बदलले असून, पूर्वी सकाळी सहा वाजता पाणी येत होते, आता दुपारी पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची दिनचर्याच बदलावी लागत आहे.
अशा गढुळ पाण्यामुळेच तेथील अनेक लोक आजारी पडत आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. स्थानीक नागरिकांनी याबाबत मीरा भाईंदर महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. आणि त्यांना लवकर लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच, परिस्थिती सुधारली नाही तर त्यांना मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
विभागाशी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्यासमोर मांडलेली आहे
नागरिकांचा आरोप आहे की, या गंभीर समस्येचे योग्य नियोजन न केल्यास महानगरपालिका प्रशासनाला त्याची जबाबदारी उचलावी लागेल.स्थानिक रहिवाशांनी पाणी पुरवठा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण समस्या बाबत शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख अजय साळवे यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करून ही समस्या त्यांच्यासमोर मांडलेली आहे यावर लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत तोडगा नाही काढला तर स्थानिकांना घेऊन महानगरपालिका कार्यालयात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.