सौजन्य - नवराष्ट्र टीम
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील परिसरात पंढरपूर -पुणे, सातारा, पंढरपूर -तीरे रस्त्यावर तसेच पुणे- पंढरपूर महामार्गावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने धोकादायकरित्या ऊस वाहतूक केली जात आहे. यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रेलरना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या मालकांना नियमावली करून त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
सध्या साखर कारखाने सुरू असल्याने ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उसाची वाहतूक बैलगाड्या, ट्रैक्टर-ट्रेलर व ट्रकमधून होत आहे. मात्र ट्रेलरच्या साहाय्याने उसाची सर्वाधिक वाहतूक होताना दिसत आहे. पुणे-पंढरपूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे त्यातच या उसाच्या ट्रेलरची भर पडली आहे. बऱ्याच वेळा ट्रॅक्टरला दोन- तीन ट्रेलर जोडलेले असतात तसेच प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरलेला असतो. त्यामुळे झोल जाऊन ट्रेलर पलटी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. दुचाकीस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी ऊस व उसाच्या मोळ्या पडल्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे.
हे सुद्धा वाचा : चोरट्यांची पण कमालच! चक्क पोलीस चौकीसमोरच ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावला
नियमावलीची अंमलबजावणी होण्याची गरज
दिवस-रात्र उसाची अशी धोकादायक वाहतूक सुरू असून, ट्रेलरला मागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळेस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अशा रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रेलरमुळे अपघातात दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागला आहे. बहुतांशी नवीन ट्रेलरला नंबर प्लेट नाहीत, तसेच ट्रॅक्टर चालकही मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावून बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवतात. ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना नियमावली करून देऊन त्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली मंगळवेढा शहरातून ऊस भरुन कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर दामाजी चौकातील इंग्लिश स्कूल गेटच्या समोर पलटी झाल्याची घटना घडली असून, पाच दिवसात ट्रॅक्टर पलटी होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दरम्यान या दोन्ही घटना सुट्टीच्या दिवशी व पहाटे घडल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही हाणी होऊ शकली नाही. प्रशासन दोन घटना घडूनही कोणाच्या मृत्यूची वाट पाहते काय? असा संतापजनक सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. मंगळवेढा शहरातून दिवसरात्र ऊसाने भरलेले ट्रॅक्टर व कर्नाटकामधून येणार्या अवजड वाहनांची ये- जा सुरु असते.