सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतील यशानंतर गुरुवारी दिनांक ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकाचं लक्ष लागले आहे. अशातचं आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबूक अकाउंटवर चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेना फेसबूक पेजला फॉलो केलं आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्रीपदही हवं होतं. पण भाजप ते देण्यात तयार नव्हतं. अर्थात खातेवाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. पण भाजप शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नसल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडी सुरु असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पेजने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना फेसबूक पेजला फॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? अशी चर्चा सुरु आहे.
ठाकरे आणि पुन्हा एकत्र येणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना फेसबूक फेसबुक पेजला फॉलो करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या पेजवरुन केवळ 9 जणांच्या पेजला फॉलो करण्यात आलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या पेजला फॉलो करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना अचानक फॉलो कस काय केलं? पडद्यामागे नेमक्या कोणत्या घडामोडी चालल्यात? उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र येतील का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. मागील अडीच वर्षातील महाराष्ट्राचे राजकारण गाजले असेल तर ते एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या नावानेचं.
हे सुद्धा वाचा : “अमृताहुनी गोड…”; रोहित पाटील बोलताच फडणवीसांना हसू अनावर
एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी भाजपशी हातमिळवणी केली. त्याचे बक्षीस म्हणून महाशक्तीने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले. शिंदे यांनीही आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले. अडीच वर्षांचे यशस्वी सरकार चालविल्यानंतर निवडणुका पार पडल्या. महायुतीला जोरदार समर्थन मिळाले. परंतु यंदा भाजपला १३२ जागा जिंकता आल्याने एकनाथ शिंदे यांना ‘मुख्य’ ऐवजी ‘उप’ खुर्चीवर बसावे लागले.