'ठाण्यात सर्वात सिनीयर मंत्री मीच', गणेश नाईक यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
महायुतीमधील अंतर्गत राजकारणाबाबत सातत्याने चर्चा होत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय मागे घेतल्याबाबतची बातमी कधी समोर येते, तर कधी एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेरण्यासाठी भाजपकडून मंत्री गणेश नाईक यांना ताकद दिली जात असल्याची चर्चा होते. शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी शिंदे आणि फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरु असल्याची सातत्याने चर्चा रंगते. विशेष म्हणजे गणेश नाईक यांनी आज आपल्या भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलं आहे. “ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे”, असं गणेश नाईक यांनी भिवंडी येथील कार्यक्रमात उघडपणे म्हटलं आहे. त्यांच्या य वक्तव्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी आज आपल्या भाषणात आपण ठाण्यातील सर्वात जास्त सिनीयर नेते असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. ठाण्यात सर्वात जास्त सिनीयर मंत्री मी आहे, असं गणेश नाईक म्हणाले आहेत. मी कधी कुणाची जात विचारत नाही. माझी जात कुणी विचारलं तर मी अभिमानाने सांगतो, असंही ते म्हणाले.
“मी 1990 ला आमदार झालो. ठाण्यात सर्वाज जास्त सीनीयर म्हणजे 4 वेळा झालेला मंत्री मी एकटाच आहे. समाजाने ते घडवलं. समाज म्हणजे नुसता आगरी समाज नाही. मी कधीही कुणाची जात विचारत नाही. कुणाी कुणाची जात विचारु नये. कुणी जात विचारली तर स्टाईलमध्ये सांगायचं की, मी आगरी आहे. पण आपण दुसऱ्याची जात विचारु नये आणिआपल्याला कुणी जात विचारु नये”, असं गणेश नाईक म्हणाले. “स्पर्धा ही सकारात्मक आणि गुणात्मक असली पाहिजे. द्वेषाची स्पर्धा असता कामा नये. जे लोकं द्वेषाच्या स्पर्धेत गुंततात त्यांची प्रगतीच होत नाही”, असंदेखील मत गणेश नाईक यांनी यावेळी मांडलं.
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात जनता दरबारवरुन महायुतीत वेगळं राजकारण सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. असं असतानाही गणेश नाईक यांच्याकडून ठाण्यात जनता दरबार सुरु करण्यात आला. त्यामुळे या जनता दरबारची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. विशेष म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेकडूनही जनता दरबार सुरु केला जाईल, असं जाहीरपणे म्हटलं. त्यामुळे ठाण्यात महायुतीमधील एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात एक वेगळीच राजकीय चुरस सुरु असल्याची चर्चा आहे.