
मनसेचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
महाजन पुढे म्हणाले की, हिंदुत्वावर काम करण्याची इच्छा असल्याने आज शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले जे घरात बसून राहिले, परीक्षेला बसले नाहीत पण पहिले आले, मात्र एकनाथ शिंदे याला अपवाद ठरले. ते परीक्षेला पण बसले आणि पहिले आले, अशा शब्दांत महाजन यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे कौतुक केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून बरे झालेल्या रुग्णांनी शिंदे यांना आभार पत्रं पाठवली, त्या पत्रांच वजन १०० किलो आहे, असं दृश्य आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दाखवलं नाही. मात्र याचा कुठेही शिंदे यांनी गाजावाजा केला नाही हा त्यांचा मोठेपणा आहे, असे महाजन म्हणाले. शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही कौतुक केले आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे प्रमुख असूनही शिंदे स्वत:ला नेता समजतात हा त्यांचा मोठेपणा आहे. काल रात्री साडेबारा वाजता एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला भेटतो हे महाराष्ट्रासाठी नवीन आहे. शिवसेना पक्ष प्रवेशासाठी मंगेश चिवटे यांचे महाजन यांनी यावेळी आभार मानले.
महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सन्मानजनक युती होईल.एक ते दोन दिवसांत अंतिम स्वरुप दिलं जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडवणीस यांचे आहेत. ते प्रत्येक महापालिकेचा आढावा घेत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना आणि भाजपा विचारांची युती आहे. केंद्रात एनडीए सरकार आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम शिवसेना करत आहेत. काहीजण स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी युती करत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा मनसे युतीवर लगावला. आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जातोय. यात महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्ष प्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल आणि ते शिवसेनेचे काम ते जनतेपुढे प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.