साहसी खेळ, भव्य मिरवणूक; ठाण्यात शिवजयंतीचा उत्सव शिगेला
ठाणे/ स्नेहा काकडे : राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे सोमवार, 17 मार्च रोजी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक तलाव पाळी, टेंभी नाका, कोर्ट नाका, स्टेशन रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, रंगो बापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली.
सर्वप्रथम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर, पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत, घोडेस्वार, लेझीम पथक, शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिक दाखवणारी पथके, बॅण्ड आदीचा समावेश होता. मिरवणुकी दरम्यान, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी मान्यवर उत्सवात सहभागी झाले.
मिरवणूक मार्गात, कोर्ट नाका येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ, जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणुकीची सांगता, तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली.
तसेच, शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने, ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, माजी नगरसेवक संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त मिनल पालांडे, विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
याबरोबर राजापूरात देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आहे. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी राजापूर शहरातून भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली होती.या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिवप्रेमीने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणाने संपूर्ण शहर परिसर दणाणून सोडला.प्रति वर्षाप्रमाणे राजापुरातील शिवस्मृती मंडळाच्या वतीने फाल्गुन कृष्णपक्ष तृतीयेला जवाहर चौक येथील शिवस्मारकात तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार व सोमवार वाहन फेरी, चित्ररथ मिरवणूक, युद्ध कला प्रात्यक्षिक व राजकीय व्याख्याते श्रीनिवास पेंडसे प्रस्तुत गर्जती सह्याद्रीचे कडे ही छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी वाहन फेरी काढण्यात आली. सुरुवातीला महामार्गावरील एसटी डेपो येथे धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाहन फेरीला सुरुवात झाली. वाहन फेरीला एसटी डेपो येथून प्रारंभ होऊन पेट्रोल पंप, मेन रोड, जवाहरचौक, छत्रपती संभाजी महाराज पेठ मार्गे वरची पेठ, राजीव गांधी स्टेडियम बंदरधक्का, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, कै. वेशंपायन गुरुजी पूल मार्गे गुजराळी, चापडेवाडी, आगलेवाडी, दिवटेवाडी साखळ कारवाडी, खडपेवाडी मार्गे पुन्हा शिवस्मारक येथे सांगता करण्यात आली.