...अन् रेल्वेतील प्रवाशांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; 'तो' अपघात ठरला मॉक ड्रिलचाच एक भाग
वर्धा : आपातकालीन परिस्थितीत नागरिकांनी नेमकी काय आणि कशी खबरदारी घ्यावी हे शिकवण्यासाठी अनेकदा अचानकपणे मॉक ड्रिल केले जाते. अशाच स्वरूपाचा मॉक ड्रिल वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गावर करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याच्या कळंबपर्यंत प्रवासी रेल्वे गाडी धावते. सेलसुरा भागात रेल्वे फाटक नसून याच ठिकाणी वर्धेवरून कळंबच्या दिशेने जात असलेल्या प्रवासी रेल्वेने ऑटोरिक्षाला धडक दिली, यात तिघे गंभीर जखमी झाले.
जखमींना रुग्णवाहिकने रुग्णालयाकडे नेले जात असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. पण, धडकी भरवणारा शुक्रवारी (दि.25) हा घटनाक्रम रेल्वे विभागाच्या सुरक्षा विभागाची मॉक ड्रिल होता. या मॉक ड्रिलच्या माध्यमातून रेल्वे विभागाने कर्मचाऱ्यांची तत्परता, समन्वय व कार्यक्षमता तपासली. शुक्रवारी (दि.25) नागपूरचे मंडल रेल्वे प्रबंधक विनायक गर्ग, मंडल संरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वर्धा-नांदेड रेल्वे मार्गावर सेलसुरा भागात एक मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडली. या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता, समन्वय आणि कार्यक्षमता तपासणे होता.
हेदेखील वाचा : तरुणांच्या स्टंटबाजीत विद्यार्थिनीचा मृत्यू; गावी जाण्यासाठी एसटीची पाहत होती वाट, ‘ती’ कार आली अन्…
काल्पनिक घटनेनुसार, दुपारी पावणे एकच्या सुमारास वर्धा-कळंब ही प्रवासी रेल्वेगाडी वर्धेहून कळंबकडे जात असताना इंजिनिअरिंग गेट क्र. डब्ल्यू. वाय. 2 येथे रेल्वे गेट उघडे असल्यामुळे ऑटोरिक्षा फाटक ओलांडताना ट्रेनला धडकली. या धडकेत 2 ते 3 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मानण्यात आली. 12.51 वाजता गार्डने ही माहिती दिल्यानंतर 12.57 वाजता सर्व वरिष्ठ अधिकारी नियंत्रण कक्षात पोहोचले. 12.58 वाजता वर्धा येथून तत्काळ मदत गाडी रवाना करण्यात आली.
आपात्कालीन तयारी दिसली
सहाय्यक संचालन व्यवस्थापक (जनरल), सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक मंडल संरक्षा अधिकारी यांनाही घटनास्थळी रवाना करण्यात आले. दुपारी 1.30 वाजता सहाय्यक मंडल संरक्षा अधिकारी यांनी ही घटना मॉक ड्रिल म्हणून घोषित केली. या मॉक ड्रिलमध्ये रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याची तयारी दाखवली.