'माझ्यावर झालेला हल्ला सरकारपुरस्कृत, चंद्रशेखर वाबनकुळे हे मास्टरमाईंड'; प्रविण गायकवाड यांचा गंभीर आरोप
पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर अहिल्यानगर (अहमदनगर) येथे रविवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे राजकीय स्तरावरही चर्चा सुरु आहेत. विधानसभेतही हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. असे असताना यावर स्वत: प्रविण गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले. ‘माझ्यावर झालेला हल्ला सरकारपुरस्कृत असून, या हल्ल्याचा मास्टरमाईंड मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे असल्याचा गंभीर आरोपच त्यांनी केला.
संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड व सोलापुर जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्यावर शाईफेक करून त्यांना मारहाणही केली गेली. त्यावेळी ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा मोठमोठ्याने घोषणाही देण्यात आल्या. या हल्ल्याबाबत गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘माझ्या अंगावर मारेकरी घालण्याचा या संघटनेचा डाव होता. अशाप्रकारे मारहाण करणे हा या संघटनेचा इतिहास आहे. माझ्यावर झालेला हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड हे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. आता हा हल्ला करणाऱ्या आरोपींवर मकोका लावणार नाहीत’.
दरम्यान, ‘मला जीवे मारण्याचा हा डाव होता. पोलिसांनी हल्ल्याची योग्य दखल घेतली नाही. दीपक काटे सातत्याने बावनकुळे यांच्यासोबत दिसत आहेत. बावनकुळे यांनी काटेची वेळोवेळी पाठराखण केली. हा हल्ला माझ्यावरचा नाही तर एका विचारावरचा हल्ला आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
हल्लेखोरांविरोधात पोलिसांत तक्रार
इन्नोव्हा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केल्याबबत अक्कलकोट उत्तर पोलिसात दाखल गुन्ह्याबाबत संशयित मुख्य आरोपी दीपक काटे व भवानेश्वर बबन शिरगिरे यांना अक्कलकोट उत्तर पोलीसांनी न्यायालयात हजर केले. संशयित आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. या घटनेबाबत इतर पाच संशयित आरोपी फरार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अक्कलकोट येथील कमलाराजे चौक येथील प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन येथे रविवारी आयोजित कार्यक्रमाकरीता प्रविण गायकवाड व कार्यकर्ते गाडीतून येत होते. यावेळी उतरुन हॉलकडे पायी चालत जात असताना संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था या नावाच्या पुढे छत्रपती हे नाव लावावे, या कारणावरुन शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, कार्यकर्ते किरण साळुंखे, भैय्या ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी, भवानेश्वर बबन शिरगिरे यांनी प्रविण गायकवाड व फिर्यादीच्या अंगावर शाई टाकून छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या होत्या.