एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री असूनही सातारा जिल्ह्याची अवस्था दयनीय; अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे
पाचगणी : सातारा जिल्ह्यात चार-चार मंत्री, एक उपमुख्यमंत्री; तरीही महाबळेश्वर-पाचगणीचा रस्ता खड्डेमय अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा नेमका विकास आहे की ढिसाळ कारभार असा प्रश्न प्रत्येक वाहनधारक आणि पर्यटकांच्या मनात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी असलेल्या या मार्गावर रस्त्यांची झालेली दुर्दशा म्हणजे प्रशासनाच्या आणि राजकारण्यांच्या अपयशाची जिवंत साक्ष आहे.
महाबळेश्वर बांधकाम विभाग कार्यालयापासून वेण्णा लेकमार्गे पसरणी घाट, पाचगणी रोड-सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, हेच ओळखता येत नाही. जिथे डांबर टाकलं, ते पावसाळ्यात वाहून गेलं आणि पुन्हा तशीच परिस्थिती. वर्षानुवर्षे मलमपट्टी करून वेळ मारून नेण्याचा सरकारी डाव आता प्रवाशांना अंगाशी येत आहे. तसेच दिवाळीला अवघे 15 दिवस राहिले आहेत. महाबळेश्वर-पाचगणीत पर्यटकांची मोठी गर्दी उसळणार आहे. पण पर्यटन हंगामातच महत्त्वाचा रस्ता खड्डेमय आहे.
हेदेखील वाचा : टाकळी बायपास ते अनवली रस्ता गेला खड्ड्यात…; रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघाताला निमंत्रण
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर–वाई–पाचगणी हा सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग असूनही त्यावर विकासाची काडीची चाहूल नाही. उलट, मेढा, पोलादपूर, तापोळा या मार्गांवर नवं डांबरीकरण झालं. मग महाबळेश्वर–पाचगणी मार्ग का दुर्लक्षित? चार मंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यात पर्यटकांचा जीव धोक्यात घालावा लागतोय, हे लाजिरवाणं नाही का?, असा सवाल विचारला जात आहे.
नागरिकांचा इशारा; आंदोलन टळणार नाही
नागरिक आणि व्यापारी वर्गानं दिवाळीपूर्वी रस्ता खड्डेमुक्त करण्याची तातडीची मागणी केली आहे. जर या रस्त्यावर खड्डे तातडीने भरले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरू. आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा स्थानिक देत आहेत. रस्त्यांची दुर्दशा पाहून पर्यटक नाराज होतात. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणीतील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिकांची उलाढाल थेट कमी होते. रोजगारावरही परिणाम होतो, असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
हेदेखील वाचा : खड्ड्यांच्या संतापाने वसई-विरार पेटले! ‘४०० कोटींची एफ.डी. गेली कुठे?’; क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर ‘पिवळे वादळ’