
बारामतीतील ‘त्या’ उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल होऊनही उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मान्यता न दिल्याने या विरोधात सतीश फाळके, अविनाश गायकवाड व अलीअसगर या तिघांनी बारामतीच्या न्यायालयात दाद मागितली होती. बारामतीच्या न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करत त्यांचे अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सतीश फाळके व ॲड. अविनाश गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, निवडणूक आयोगाने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, बारामतीच्या न्यायालयाच्या कार्यकक्षेबाहेरचे हे प्रकरण आहे, असे नमूद करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. बुधवारी (दि १०) मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक निर्णय, अधिकाऱ्यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी युक्तिवाद करत न्यायालयाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या अधिकार कक्षेबाहेरील असल्याचे नमूद केले.
प्रक्रियाच ठरविली रद्द
न्यायालयानेही ही भूमिका मान्य करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाच रद्द ठरविली. त्यामुळे दाखल झालेले दोन्ही अर्ज आता रद्द ठरणार आहेत. उर्वरित निवडणुकीची प्रक्रीया पूर्वी ठरल्यानुसारच होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान सतीश फाळके व ॲड अविनाश गायकवाड यांनी बिरजू मांढरे व अल्ताफ सय्यद या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मांढरे व सय्यद यांच्या वतीने ॲड. अक्षय महाडिक यांनी बाजू मांडली. दरम्यान २० डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीचे मतदान होणार असून, २१ रोजी मतमोजणी होणार आहे.