शिवाजीनगरची लढत ठरणार चुरशीची, बहिरट की शिरोळे? कोण मारणार बाजी?
पुणे : शिवाजीनगर मतदारसंघात काॅंग्रेसमध्ये झालेल्या बंडखाेरीमुळे भाजपने सुस्कारा साेडला आहे. काॅंग्रेसचे बंडखाेर उमेदवार किती मते मिळविणार यावर या मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून आहे. मतदारसंघात भाजप आणि काॅंग्रेस या दाेन्ही पक्षांचा मतदार माेठ्या प्रमाणावर असल्याने येथील लढत चुरशीची ठरणार आहे. भाजपकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार सिद्धार्थ शिराेळे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यासमाेर काॅंग्रेसचे दत्ता बहीरट यांचे आव्हान आहे. ही लढत दुरंगी हाेण्याची चिन्हे असतानाच, काॅंग्रेसमध्ये बंडखाेरी झाली आहे. खडकी कॅन्टाेन्मेट बाेर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी बंडखाेरी केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. त्यामुळे मनिष आनंद यांची उमेदवारी ही काॅंग्रेसला धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात २००९ साली विनायक निम्हण हे निवडून आले हाेते. त्यांना ५० हजार ९१८ मते मिळाली हाेती. त्यांनी भाजपचे विकास मठकरी यांचा पराभव केला हाेता. मठकरी यांना ३० हजार ३८८ मते मिळाली हाेती. तर मनसेचे रणजित शिराेळे यांनी २६ हजार १४३ मते घेेतली. तर २०१४ मध्ये माेदी लाट असताना भाजपचे विजय काळे या मतदारसंघातून विजयी झाले हाेते. काळे यांना ५६ हजार ४६० मते मिळाली हाेती, त्यांनी विद्यमान आमदार विनायक निम्हण यांचा २२ हजार ४७ मतांनी पराभव केला हाेता. निम्हण यांना ३४ हजार ४१३ मते मिळाली हाेती. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस देखील निवडणुकीत उतरले हाेते. त्यांचे उमेदवार अनिल भाेसले यांना २४ हजार १७३ मते मिळाली हाेती. तर शिवसेनेचे मिलींद एकबाेटे यांना १४ हजार ६६२ मते, परशुराम वाडेकर यांना १५ हजार ४३० मते मिळाली हाेती. या मतदारसंघात विराेधी मतांची विभागणी झाल्याने हा मतदारसंघ भाजपने जिंकला हाेता.
हे सुद्धा वाचा : बंडखोर बिघडवणार दिग्गजांची गणिते; ‘या’ मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे लक्ष
२०१९ साली विद्यमान आमदार काळे यांना डावलत पक्षाने सिद्धार्थ शिराेळे यांना उमेदवारी दिली. मागील निवडणुकीत शिराेळे यांच्या विराेधात काॅंग्रेसचे दत्ता बहीरट हाेते. ही लढत दुरंगी झाली, पण यात शिराेळे यांनी पाच हजाराहून अधिक मतांनी विजय मिळविला हाेता. वंचित बहुजन आघाडीचे अनिल कुऱ्हाडे यांनी १० हजार ४५४ मते मिळविली, त्याचा फटका बहीरट यांना बसला. बहीरट यांना ५३ हजार ६०३ मते मिळाली हाेती. यावेळी विराेधी मतांचे विभाजन झाल्याचा फायदा भाजपला झाला.
लाेकसभेसाठी भाजपला अपेक्षित मताधिक्य नाही
नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर माेहाेळ यांना या मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नव्हते. यामुळे या मतदारसंघातील चित्र यावेळी बदलू शकते असे चित्र निर्माण झाले हाेते. विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस बंडखाेर मनिष आनंद हे किती मते मिळवितात यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल.