लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. निवडणुकीच्या प्रचाराची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे.आज पिंपरी-चिंचवडमधील फॉर्च्युन हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. देशाचा कारभार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली पुढे जाऊ शकतो. दुसरा कुठलाही पर्याय विरोधी पक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
१४० कोटी जनतेचा कारभार नरेंद्र मोदी यांनी सांभाळा आहे. आता खात्री आहे या देशाचा कारभार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिला पुढे जाऊ शकेल. विरोधी पक्षांमध्ये दुसरा कोणताही पर्याय आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मोदींना विरोध करण्यासाठी त्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देशातील जनता अतिशय सुज्ञ विचारपूर्वक आहे. जागतिक पातळीवर देशाचे नाव वाढवण्यासाठी आणि नावलौकिक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. मला खात्री आहे देशाचा कारभार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालेल. या पदासाठी कुठलाही दुसरा पर्याय आपल्या विरोधी पक्षांमध्ये नाही. मोदींना विरोध करण्यासाठी आघाडी निर्माण करण्यात आली आहे, असे अजित पवार म्हणाले.
एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशावर अजित पवार म्हणाले..
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बरेच दिवसांपासून त्यांची घालमेल सुरु होती. आता त्यांना निर्णय घ्यावासा वाटला. लोकसभेतील काही जागा ठरवण्यासाठी विलंब लागतो. महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असली तरी जागा वाटपासाठी वेळ लागतो. पण आम्ही लवकरच यावर निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असून अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल, असे अजित पवार म्हणाले. प्रवीण माने हा मूळचा माझा कार्यकर्ता आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्वजण घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हावरील उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.