चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी : अजित पवार
मुंबई : इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो, असे सांगून शासन चांगले काम करणाऱ्यांच्या कायम पाठिशी आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षमतेला पारदर्शकतेची जोड द्यावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात दुसऱ्या टप्प्यातील विभाग स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
विधानभवन सभागृहात विभागीय पातळीवर झालेल्या ‘१०० दिवस कार्यालयीन सुधारणा अभियान’ पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२२) वितरण करण्यात आले. महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयास प्रथम तर बारामती परिमंडल कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सोबतच वाडिया उपविभाग व चाकण एमआयडीसी उपविभागांनीही या स्पर्धेत प्रशस्तीपत्रक मिळविले आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व बारामतीचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, मुख्य अभियंता सुनिल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेच्या समितीकडून या कार्यालयांचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. त्यात पुणे प्रादेशिक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे
अधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर आनंद होतो
अजित पवार म्हणाले, ‘अधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर आनंद होतो. त्यांच्या चांगल्या कामांचे इतरांनीही अनुकरण करावे. तसेच कर्मचाऱ्यांनी जुन्या पद्धतीला बदलून नवनवीन पद्धतींचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करुन नागरिकांचा श्रम व वेळ वाचवण्याचे प्रयत्न करावेत व प्रशासनाला जास्तीत जास्त लोकाभिमुख करावे.’
अनेक प्रादेशिक विभाग कार्यालयांचा सहभाग
महावितरणच्या कार्यालयांतील नागरिकांसाठी सेवा सुलभता, डिजिटल ग्राहक सेवा, कार्यालयीन सोयीसुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण, कामकाजातील सुधारणा व कार्यालयीन व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियान राबविण्यात आले होते. यात महावितरणच्या प्रादेशिक विभागस्तरावर पुणे, कोकण व नागपूर प्रादेशिक विभाग कार्यालये सहभागी झाले होते.