पावसाळी प्रवास होणार सुकर; कल्याण गौरीपाडामधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा संपन्न (फोटो सौजन्य-X)
कल्याण : ३१ मे, २०२५नंतर एखाद्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम अपूर्णावस्थेत आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांचा पावसाळ्यातील प्रवास सुकर होण्याची चिन्हे आहेत. यानंतर आता कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 5 मधील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा रविवारी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार आणि युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 5 गौरीपाडा येथील वृंदावन रेसिडेन्सी ते साई चौक योगीधाम पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून 50 लाख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपयांचा विकासनिधी यासाठी प्राप्त झाला आहे. या संयुक्त निधीच्या माध्यमातून याठिकाणी आता सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केलं जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी आमदार नरेंद्र पवार, युवासेना जिल्हा चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
तर यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी दया गायकवाड यांच्या प्रभागातील कामाची स्तुती केली. तसेच कोविड काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाचीही यावेळी विशेष आठवण करून देत कौतुकाची थाप दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला भाजपा 138 विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे, भगवान म्हात्रे, श्याम मिरकुटे, नरेंद्र सिंग, पप्पू मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
तसेच पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून, मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी संपली नाहीत तर होणाऱ्या प्रवासहालाचा विचार करूनही मुंबईकरांना धडकी भरत आहे. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण झाली तर पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांपासून मुंबईकरांची सुटका होईल आणि पावसाळ्यातील प्रवास सुकर होईल. मुंबईकरांकडून केल्या जाणाऱ्या तक्रारी आणि टीकेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी रस्ते कामांचा कंत्राटनिहाय आढावा घेत संबंधितांशी संवाद साधला. यावेळी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, रस्ते आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदारांचे प्रतिनिधी, विविध सेवा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.