संग्रहित फोटो
पंढरपूर : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्वावर केली आहे. तसेच त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला आहे. पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी खडसे हे रविवारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली. पूर्वीची भाजप ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील होती. अगदी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर तातडीने मंत्रिपदाचा एकनाथ खडसे राजीनामा घेतला होता. परंतु, आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक पक्षात घेतले जात आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आज ९० टक्के लोक हे बाहेरचे असून विविध भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, अशी टीका एकनाथ खडसे यांनी भाजप नेतृत्वावर केली.
भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहे का? असे विचारले असता खडसे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना क्लीनचिट दिली. यासाठी फडणवीस यांना एकट्याला दोष देणे चुकीचे आहे. मी भाजपमध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यानंतर महाजन कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असे म्हणत महाजन यांच्यावरही खडसेंनी टीका केली.
भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला
खडसे म्हणाले, ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती. ते आज पक्षात आहेत. ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तेही आज भाजपसोबत आहेत, असा टोला एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्यामुळे भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला आहे. मी अंधारात असताना मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्यासोबतच मी असणार आहे, असेही खडसे यांनी सांगितले.
दोन ठाकरे यांनी एकत्र यावे
भाजपच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरेंनी एकत्र आलेच पाहिजे. तसेच सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्यास आगामी निवडणुकात चांगले यश मिळेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.